
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली सर्व विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. शिर्डी येथील साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. डॉ. प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांना बजावले की, कुंभमेळ्याच्या काळात गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयीपेक्षा भाविकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण आणि परिसरातील रस्त्यांची कामे कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण होणे आवश्यक आहे. विशेषतः विमानतळ विस्तारीकरणाचे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिर्डी हे रेल्वे टर्मिनस असल्याने तेथे गाड्या वळवण्यासाठी बराच वेळ लागतो, ज्यामुळे स्थानकावर ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी गेडाम यांनी कोपरगाव पॅटर्न राबवण्याचे निर्देश दिले. यानुसार, लांब पल्ल्याच्या गाड्यांना कोपरगाव स्थानकावर थांबा देऊन तेथून विशेष बसेसद्वारे भाविकांना शिर्डीत आणले जाईल. तसेच, एस.टी. महामंडळ पर्वणी काळात दररोज सहाशे ऐंशी फेऱ्यांचे नियोजन करणार असून, शिर्डी ते त्र्यंबकेश्वर अशी थेट बस सेवाही सुरू केली जाणार आहे. नगर – मनमाड महामार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहे. शिर्डी-राहाता बायपासच्या कामाबाबत आयुक्तांनी कडक भूमिका घेतली आहे. या कामाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास ते काम पुन्हा करून घेण्याचा इशारा त्यांनी दिला असून, ते स्वतः साहित्याची व कामाची पाहणी करणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहने येवला – वैजापूर मार्गे वळवण्यात येतील. पार्किंग क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जाईल आणि स्वच्छतेसाठी पाचशे अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जातील. टँकरवर अवलंबून न राहता निळवंडे कालव्यावरून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. अखंडित वीज पुरवठ्यासाठी बाभळेश्वर येथून पर्यायी वीज वाहिनी टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. शिर्डीच्या पंधरा किमी आधीपासूनच तीन भाषांमध्ये म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजीत दिशादर्शक फलक लावले जातील. पार्किंगच्या उपलब्धतेसाठी डिजिटल स्क्रीन्स आणि संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. मोबाईल नेटवर्कसाठी चौदा नवीन आणि पाच फिरते टॉवर्स उभारले जातील. अग्निशमन दलासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी नाशिकच्या एकत्रित प्रस्तावात समाविष्ट करण्यात आली आहे. प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष पथक आणि अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे.