
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यासाठी राज्य सरकारने मिशन सुधार अभियान हाती घेतले आहे. अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही लोक अत्यल्प दरातील धान्य लाटत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या मोहिमेमुळे आता बोगस रेशन कार्डधारकांचे धाबे दणाणले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मिशन सुधार मोहिमेचा मुख्य उद्देश हा शिधापत्रिकांमधील त्रुटी दूर करणे आणि अपात्र लोकांना प्रवाहाबाहेर काढून त्या जागी खऱ्या गरजूंना समाविष्ट करणे हा आहे. सध्या अनेक शिधापत्रिकांवर मृतांची नावे, स्थलांतरित व्यक्तींची नावे किंवा लग्नानंतर दुसऱ्या गावी गेलेल्या मुलींची नावे तशीच आहेत, ज्यामुळे धान्याचा अपव्यय होत आहे.
कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे, कुटुंबातील कोणाकडेही पाच एकरपेक्षा जास्त बागायती जमीन असल्यास, कुटुंबातील सदस्य प्राप्तिकर भरत असल्यास, कुटुंबात कोणीही राजपत्रित अधिकारी किंवा निमशासकीय सेवेत असल्यास, आता पिवळी किंवा केशरी रेशन कार्डे रद्द केली जाणार आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून सर्व रेशन कार्डधारकांना त्यांचे आधार लिंकिंग आणि ई – केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेशन दुकानावरील पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा उमटवून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ज्या कार्डधारकांनी दीर्घकाळापासून धान्य घेतलेले नाही किंवा ज्यांचे ई – केवायसी झालेले नाही, त्यांची कार्ड ब्लॉक केली जातील. शासनाने अपात्र कार्डधारकांना स्वतःहून त्यांचे रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन केले आहे. जर तपासणीत कोणी दोषी आढळले, तर त्यांच्याकडून आजवर घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली केली जाईल. पुणे विभागात यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून ती घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
राज्यात सध्या नवीन रेशन कार्डांसाठी हजारो अर्ज प्रलंबित आहेत. मिशन सुधार अंतर्गत जेव्हा अपात्र लोकांची नावे कमी होतील, तेव्हा निर्माण होणाऱ्या रिक्त जागी नवीन आणि खऱ्या गरजू कुटुंबांना प्राधान्याने रेशन कार्डे दिली जातील. पुरवठा विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या मोहिमेचा साप्ताहिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रेशन दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात होणारे संगनमत तोडण्यासाठी कडक देखरेख ठेवली जाणार आहे.