एक मे पासून मुंबई – पुणे प्रवास होणार अधिक वेगवान
मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वास आला आहे. खंडाळा घाटातील वळणदार रस्ता आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या भीतीमुळे होणारा प्रवासाचा अडथळा आता कायमचा दूर होणार आहे. एक मे २०२६ रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता असून, यामुळे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
सध्याच्या द्रुतगती मार्गामधील खोपोली – खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट – लोणावळा दरम्यानचा नवीन मार्ग हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे. या प्रकल्पात दोन भव्य बोगदे असून त्यांची रुंदी सुमारे तेवीस पूर्णांक पाच मीटर आहे. हे आशियातील सर्वात रुंद बोगदे मानले जातात. या मार्गावर जगातील सर्वाधिक उंचीचा म्हणजे सुमारे एकशे पस्तीस ते दीडशे मीटर उंचीचा, केबल स्टे पूल बांधण्यात आला आहे. हा पूल दोन डोंगररांगांना जोडतो. हा प्रकल्प आठ पदरी असून सध्याच्या एक्सप्रेसवेची क्षमता यामुळे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सध्या खंडाळा घाट ओलांडण्यासाठी साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे लागतात. मिसिंग लिंकमुळे हे अंतर केवळ पंधरा ते वीस मिनिटांत पार करता येईल. म्हणजेच प्रवाशांच्या वेळेत किमान पंचवीस ते तीस मिनिटांची बचत होईल. सध्याच्या मार्गावर अमृतांजन पूल आणि तीव्र वळणांमुळे वाहतूक कोंडी होते. नवीन मार्ग बोगद्यातून जात असल्याने घाट पूर्णपणे टाळता येईल. चढ-उतार कमी झाल्यामुळे वाहनांचे इंधन वाचेल. तसेच पावसाळ्यात दरडी कोसळून होणारे अपघात आणि रस्ते बंद होण्याचे प्रकार आता थांबतील.
डोंगररांगांमध्ये बोगदे खोदणे आणि अत्यंत खोल दरीवर भव्य पूल उभा करणे हे अभियांत्रिकी दृष्टीकोनातून मोठे आव्हान होते. एक मे च्या उद्घाटनासाठी सध्या बोगद्यांमधील शेवटचे काँक्रिटीकरण, विद्युत व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांची चाचणी वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा हायवे ठरणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून मुंबईकडे येणारी जलद वाहतूक या नवीन मिसिंग लिंकवरून वळवली जाईल. सध्याचा जुना घाट मार्ग जड वाहने किंवा पर्यटनासाठी खुला ठेवला जाऊ शकतो, ज्यामुळे लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीही कमी होईल.