अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी इस्रोला भेट देणार
अहिल्यानगर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आणि त्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी चक्क बेंगळुरू येथील इस्रो केंद्राची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील सामान्य कुटुंबातील मुलांना थेट अंतराळ विज्ञानाचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची निवड केवळ गुणांच्या आधारावर नाही, तर एका विशेष स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे करण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी, निबंध स्पर्धा आणि मुलाखती घेण्यात आल्या. यातून निवडले गेलेले बेचाळीस विद्यार्थी या ऐतिहासिक सहलीचे मानकरी ठरले.
अनेक विद्यार्थ्यांसाठी ही सहल केवळ शैक्षणिक नव्हती, तर आयुष्यातील पहिला विमान प्रवास ठरली. पुण्याहून बेंगळुरू आणि पुढे त्रिवेंद्रमपर्यंतचा प्रवास विमानाने करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आकाशात झेप घेण्याचे स्वप्न या निमित्ताने प्रत्यक्षात अनुभवले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा अभिमान यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पाहायला मिळाला. ही सहल केवळ फिरण्यासाठी नसून ती ज्ञान सहल म्हणून ओळखली जात आहे. या पाच ते सहा दिवसांच्या दौऱ्यात विद्यार्थी इस्रो, त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, सर विश्वेश्वरय्या म्युझियम, म्युझियम आणि साऊंड रॉकेट शो यांना भेट देणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि त्यांच्या टीमने केले. ग्रामीण भागातील मुलांनी केवळ पुस्तकी विज्ञान न शिकता, ते प्रत्यक्षात अनुभवावे हा यामागचा मुख्य उद्देश होता. जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष आणि शिक्षण विभागाने या उपक्रमासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची बुद्धिमत्ता असते, मात्र संधी आणि मार्गदर्शनाचा अभाव असतो. अशा प्रकारच्या ‘स्पेस सायन्स ट्रिप’मुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल. भविष्यात हेच विद्यार्थी शास्त्रज्ञ म्हणून देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.