गाझा शांतता मंडळासाठी अमेरिकेचे भारताला निमंत्रण

मध्य पूर्वेतील अशांतता दूर करण्यासाठी आणि गाझा पट्ट्यात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण पाठवले आहे. अमेरिकेने स्थापन केलेल्या गाझा बोर्ड ऑफ पीस या महत्त्वाकांक्षी परिषदेत भारताने सहभागी व्हावे, अशी विनंती ट्रम्प यांनी पत्राद्वारे केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा संघर्ष संपवण्यासाठी एक वीस कलमी व्यापक योजना मांडली होती. या योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही मान्यता दिली आहे. गाझा बोर्ड ऑफ पीस हे या योजनेचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हे मंडळ केवळ चर्चा करण्यासाठी नसून, ते एक नवीन आंतरराष्ट्रीय संघटना आणि संक्रमणकालीन प्रशासन म्हणून काम करेल. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्ट्याची पुनर्बांधणी करणे, गाझामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांची तैनात करणे आणि हमासचे नि:शस्त्रीकरण सुनिश्चित करणे, गाझामध्ये नवीन पॅलेस्टिनी प्रशासकीय यंत्रणा उभारणे. भविष्यात हा परिसर दहशतवादमुक्त आणि शेजारील देशांसाठी सुरक्षित ठेवणे, हे या बोर्डाचे मुख्य उद्दीष्ट्य असेल.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात भारताच्या जागतिक भूमिकेची प्रशंसा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, मध्य पूर्वेतील शांतता अधिक मजबूत करण्यासाठी आणि जागतिक संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला आमच्या सोबत येण्याचे निमंत्रण देणे हा माझा मोठा सन्मान आहे. ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री ही केवळ दोन नेत्यांमधील संबंध नसून, ती दोन मोठ्या लोकशाही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पत्रात ‘भविष्यातील स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची वेळ’ असा उल्लेख करत भारताच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. या मंडळाचे कायमस्वरूपी सदस्य होण्यासाठी देशांना एक अब्ज डॉलर्सचा निधी द्यावा लागणार आहे. हा निधी प्रामुख्याने गाझाच्या पुनर्बांधणीसाठी वापरला जाईल. जे देश हा निधी देऊ शकणार नाहीत, त्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरते सदस्यत्व दिले जाईल. भारत, पाकिस्तान, हंगेरी, तुर्की, कतार आणि इजिप्तसह सुमारे साठ देशांना या उपक्रमासाठी निमंत्रण धाडण्यात आले आहे.






17,745 वेळा पाहिलं