रशियामध्ये विक्रमी बर्फवृष्टी – जनजीवन विस्कळीत

रशियातील सायबेरिया आणि पूर्वेकडील प्रांतांमध्ये सध्या सुरू असलेल्या विक्रमी बर्फवृष्टीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवादळामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, रस्त्यांवरील गाड्या किंवा छोटी घरे सोडाच, चक्क चार मजली इमारतीही बर्फाच्या थराखाली दबल्या गेल्या आहेत. रशियाच्या इतिहासातील ही सर्वात भीषण बर्फवृष्टी असल्याचे बोलले जात आहे.

रशियाच्या सखालिन आणि कामचटका यांसारख्या दुर्गम भागात बर्फवृष्टीचा वेग इतका प्रचंड होता की, पाहता पाहता सोळा ते वीस फुटांचे बर्फाचे डोंगर उभे राहिले. अनेक ठिकाणी इमारतींचे पहिले तीन मजले पूर्णपणे बर्फाने झाकले गेले आहेत. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना खिडक्या उघडणेही अशक्य झाले असून, अनेक रहिवासी आपल्याच घरात कैद झाले आहेत. या भीषण बर्फवृष्टीमुळे रस्ते आणि महामार्ग पूर्णपणे दिसेनासे झाले आहेत. प्रशासनाने रस्ते साफ करण्यासाठी मोठ्या यंत्रणा कामाला लावल्या आहेत, मात्र साचलेल्या बर्फाची उंची इतकी जास्त आहे की, बुलडोझर आणि स्नो-कटर मशिनही तिथे तोकड्या पडत आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या कार शोधण्यासाठी बर्फात खोलवर उत्खनन केल्याचे पाहायला मिळाले, तरीही गाड्या सापडणे कठीण झाले आहे.

रेल्वे मार्ग, विमानतळ आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ट्रकलाही शहरात प्रवेश करणे कठीण झाले आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. लोकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्फाच्या प्रचंड वजनामुळे वीजवाहिन्या तुटल्या आहेत, ज्यामुळे अनेक गावे आणि शहरे अंधारात बुडाली आहेत. मोबाईल टॉवरवर बर्फ साचल्याने नेटवर्कची समस्याही निर्माण झाली आहे.

रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने या भागांत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. सैन्याच्या तुकड्यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जे लोक इमारतींच्या वरच्या मजल्यांवर अडकले आहेत, त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अन्न आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. तसेच, बर्फ कापून बाहेर पडण्यासाठी तात्पुरते बोगदे तयार केले जात आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, आर्क्टिक समुद्राकडून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली आहे. रशियामध्ये हिवाळा नेहमीच कडक असतो, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या वेगाने बर्फ साचण्याची ही पहिलीच वेळ आहे.






2,188 वेळा पाहिलं