नाशिकमधील देवळालीत स्वदेशी शस्त्रास्त्रांचे चित्तथरारक प्रदर्शन
भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाचे सामर्थ्य आणि अचूकता सिद्ध करणारा सराव तोपची २०२६ हा भव्य कार्यक्रम नाशिकमधील देवळाली फिल्ड फायरिंग रेंजवर पार पडला. या सरावाच्या माध्यमातून भारताने जगाला आपल्या लष्करी आधुनिकतेची आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या यशाची चुणूक दाखवून दिली आहे. यंदाच्या सरावात भारतीय लष्करासोबतच नेपाळ लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती हे विशेष आकर्षण ठरले.
यंदाच्या प्रदर्शनात प्रामुख्याने स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर भर देण्यात आला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या तोफांनी जेव्हा लक्ष्याचा वेध घेतला, तेव्हा संपूर्ण देवळाली परिसर हादरून गेला. बोफोर्सचे भारतीय स्वरूप मानल्या जाणाऱ्या धनुष तोफेने आपल्या अचूकतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा वेध घेण्यात ही तोफ कमालीची यशस्वी ठरली. के – नऊ वज्र या दक्षिण कोरियाच्या सहकार्याने भारतात बनवण्यात आलेल्या या सेल्फ प्रोपेल्ड तोफेने आपली गतिशीलता आणि मारक क्षमता सिद्ध केली. मल्टि-बॅरल रॉकेट लाँचर पिनाकाने अवघ्या काही सेकंदात शत्रूचा तळ उद्ध्वस्त करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. जुन्या तोफांचे आधुनिकीकरण करून तयार केलेल्या सारंग तोफेचाही या सरावात समावेश होता. भारत आणि नेपाळ यांच्यातील लष्करी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नेपाळ लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या सरावासाठी उपस्थित होते. भारतीय तोफखाना शाळा केवळ भारतीय सैनिकांनाच नव्हे, तर मित्र राष्ट्रांच्या सैनिकांनाही प्रशिक्षण देते. या सरावादरम्यान नेपाळी अधिकाऱ्यांनी भारतीय तंत्रज्ञानाचे आणि युद्धनीतीचे कौतुक केले.
यंदाच्या तोपची सरावात केवळ तोफाच नव्हत्या, तर आधुनिक युद्धभूमीवर महत्त्वाची भूमिका बजावणारे ड्रोन आणि देखरेख यंत्रणांचा प्रभावी वापर करण्यात आला. ड्रोनच्या सहाय्याने शत्रूची नेमकी जागा शोधून ती माहिती तोफखान्याला रिअल-टाइममध्ये पाठवण्यात आली. माहिती मिळताच काही सेकंदात तोफांनी त्या जागेवर मारा केला. अंधारातही शत्रूवर अचूक मारा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या थर्मल इमेजर आणि लेझर गाईडेड यंत्रणेचे सादरीकरण करण्यात आले. देवळाली हे आशिया खंडातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. दरवर्षी होणारा सराव तोपची हा केवळ लष्करी सराव नसून, तो नवीन अधिकाऱ्यांसाठी आणि प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असतो. या प्रदर्शनामुळे नाशिकच्या लष्करी इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.