काझीरंगा उन्नत मार्गिका –  महामार्गावरील वन्यप्राण्यांचे अपघात थांबणार

केंद्र सरकारने निसर्ग संवर्धन आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा मेळ घालत आसाममध्ये एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपये खर्चाच्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प केवळ रस्ते जोडणीच सुधारणार नाही, तर युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगातील वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी एक मैलाचा दगड ठरेल.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय महामार्ग सातशे पंधरावरून होणारी वाहतूक आणि जंगलातील प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करणे हा आहे.हा प्रकल्प एकूण शहाऐंशी किलोमीटर लांबीचा असून त्यामध्ये पस्तीस किलोमीटरचा भाग उन्नत मार्गिका असेल. यासाठी कालियाबोर ते नुमालीगड या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. शहरांमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जाखलबंधा आणि बोकाखत येथे स्वतंत्र बायपास तयार केले जातील.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात जेव्हा ब्रह्मपुत्रा नदीला पूर येतो, तेव्हा उद्यानातील प्राणी सुरक्षिततेसाठी उंच टेकड्यांच्या दिशेने स्थलांतर करतात. हे स्थलांतर करताना त्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडवा लागतो. वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या धडकेत अनेकदा गेंडे, हत्ती आणि हरणांचा मृत्यू होतो. एलिव्हेटेड रोडमुळे प्राणी रस्त्याखालून सुरक्षितपणे जाऊ शकतील. उन्नत मार्गिकेखाली प्राण्यांच्या नैसर्गिक हालचालीसाठी जागा सोडली जाणार आहे, ज्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल. प्राण्यांच्या स्थलांतरामुळे अनेकदा महामार्गावरील वाहतूक थांबवावी लागते किंवा वेग मर्यादित ठेवावा लागतो. आता वाहने वरून वेगाने जातील आणि प्राणी खालून मोकळेपणाने वावरतील. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, काझीरंगा हा केवळ आसामचाच नव्हे तर भारताच्या जैवविविधतेचा अनमोल ठेवा आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल. गुवाहाटी ते दिब्रुगड आणि तिनसुकिया यांसारख्या शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्याचा फायदा स्थानिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला होईल.






17,152 वेळा पाहिलं