पुणे ग्रँड टूरमधील तिसऱ्या टप्प्याचा बारामतीत समारोप
बारामती येथे पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप झाला. या स्पर्धेमुळे जिल्ह्यात क्रीडामय वातावरणच तयार झाले. सोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अडथळे विरहित आणि दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. या पायाभूत सुविधांमुळे भविष्यात जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय परिसरात आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विजेत्या सायकलपटूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. पुणे ग्रँड टूर ही केवळ एक स्पर्धा नसून, त्याद्वारे देश-विदेशातील नागरिकांना पुणे जिल्ह्याची एक नवी ओळख झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याकडील उत्कृष्ट मार्ग, प्रगत पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेली परिसराची क्षमता जगासमोर आली आहे. नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये व्यावसायिक खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी, हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल माहिती देताना उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन अत्यंत सूक्ष्म नियोजन केले होते. विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन ही या स्पर्धेची जमेची बाजू ठरली. नागरिकांनी पाळलेली स्वयंशिस्त आणि प्रशासकीय सूचनांचे केलेले पालन यामुळेच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू शकली, असे अजित पवार यांनी म्हटले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशी-विदेशी सायकलपटूंनी पुणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. स्पर्धेचे मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला एक विशेष ऊर्जा मिळाली, अशा भावना खेळाडूंनी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. या भव्य आयोजनात केवळ सरकारच नव्हे, तर खासगी क्षेत्राचाही मोठा वाटा असल्याचे पवार यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकार, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयासोबतच बजाज, सिरम इन्स्टिट्यूट, पंचशील ग्रुप यांसारख्या नामांकित कंपन्या आणि विविध आरोग्य व क्रीडा संस्थांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवला. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच ही स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.