प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा गणेशोत्सवाचा चित्ररथ

भारताच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. यावर्षी महाराष्ट्राने गणेशोत्सव हा विषय निवडला असून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून केलेली समाजजागृती या चित्ररथाद्वारे जगासमोर मांडली जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्ररथ साकारला जात असून, राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन यातून घडणार आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी ओळखला जातो. यावेळच्या चित्ररथात गणेशोत्सवाचे आध्यात्मिक आणि सामाजिक पैलू एकत्रित गुंफण्यात आले आहेत. स्वातंत्र्यलढ्यात जनतेला एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. चित्ररथाच्या दर्शनी भागात टिळकांची भव्य प्रतिमा आणि त्या काळातील सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दाखवण्यात येणार आहे. चित्ररथावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घडवणारी कलाकृती असेल. यामध्ये पुणे आणि मुंबईतील काही मानाच्या गणपतींच्या प्रतिकृतींचा समावेश असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पारंपारिक वाडे, मंदिरांवरील नक्षीकाम आणि उत्सवातील विद्युत रोषणाई यांचे हुबेहूब चित्रण या चित्ररथावर पाहायला मिळेल.

केवळ चित्ररथच नाही, तर त्यासोबत चालणारे कलाकारही कर्तव्यपथावर महाराष्ट्राची कला सादर करणार आहेत. महाराष्ट्राची शान असलेले ढोल-ताशा पथक या संचलनात सहभागी होणार असून, त्यांच्या गर्जनेने दिल्लीचे आकाश दुमदुमणार आहे. नऊवारी साडी, फेटा आणि पारंपारिक दागिने परिधान केलेले कलाकार गणपती बाप्पाच्या स्वागताचे नृत्य सादर करतील. चित्ररथासोबत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन घडवणारे कलाकार आपली कला सादर करतील. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी चित्ररथाची निवड होणे ही अत्यंत मानाची बाब मानली जाते. संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसमोर अनेक सादरीकरणे केल्यानंतर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव संकल्पनेवर मोहोर उमटवण्यात आली. सध्या दिल्लीतील कँटोन्मेंट भागात या चित्ररथाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आणि शिल्पकार दिवस-रात्र यावर काम करत आहेत.

महाराष्ट्राने यापूर्वी साडेतीन शक्तीपीठ, आजादी का अमृत महोत्सव आणि जैविक विविधता अशा विषयांवर चित्ररथ सादर करून अनेकदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. यावर्षी गणेशोत्सव या विषयाद्वारे एकता आणि सामाजिक समरसता हा संदेश देण्याचा राज्याचा प्रयत्न आहे.






10,470 वेळा पाहिलं