प्रजासत्ताक दिनी दोन कोटी विद्यार्थी एकाच वेळी करणार सामूहिक कवायत

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये एकाच वेळी देशभक्तीवर आधारित गीतांवर सामूहिक कवायत सादर केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते. राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम राज्यातील शैक्षणिक इतिहासातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक ठरणार आहे.

या सामूहिक कवायतीमध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळा सहभागी होणार आहेत. सुमारे सात लाख शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी या कार्यक्रमात एकाच वेळी सहभागी होणार आहेत, अशी माहिती देत मंत्री भुसे यांनी या उपक्रमाची व्याप्ती स्पष्ट केली. शासकीय ध्वजवंदन समारंभ पार पडल्यानंतर ही सामूहिक कवायत सुरू होईल. विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, स्वयंशिस्त आणि शारीरिक आरोग्याप्रती जागरूक करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. व्यायाम आणि राष्ट्रभक्ती यांची सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. हा कार्यक्रम फक्त पंधरा ते वीस मिनिटांचा असणार आहे. मात्र, त्याची तयारी अत्यंत सूक्ष्म पातळीवर करण्यात आली आहे. सर्व शाळांना कवायतीचा नमुना मार्गदर्शक व्हिडिओ आधीच पाठवण्यात आला आहे. दर शनिवारी शाळांमध्ये या सामूहिक कवायतीचा विशेष सराव करून घेण्यात येत आहे, जेणेकरून मुख्य दिवशी कार्यक्रमात सुसूत्रता राहील. प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नियुक्ती मार्गदर्शक म्हणून करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे सोपे जाईल.

प्रजासत्ताक दिनी ही कवायत केवळ शाळांच्या आवारातच नव्हे, तर गावातील किंवा शहरातील मोठ्या मैदानांवरही आयोजित केली जाऊ शकते. मैदानांच्या क्षमतेनुसार अनेक शाळा एकत्र येऊनही हा सोहळा साजरा करू शकतात. या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पालक, शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात येणार आहे. यामुळे हा कार्यक्रम केवळ शाळेचा न राहता संपूर्ण समाजाचा एक उत्सव बनेल, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम जरी व्यापक असला तरी आरोग्याच्या बाबतीत पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. आजारी, शारीरिकदृष्ट्या अशक्त किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना ही कवायत करण्याची कोणतीही सक्ती नसेल. अशा विद्यार्थ्यांनी केवळ उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला तरी चालेल, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण आयुक्त या संपूर्ण कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. हा कार्यक्रम अभूतपूर्व देशभक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन दादा भुसे यांनी यावेळी केले.






17,757 वेळा पाहिलं