सूर्यकिरण टीमचा एअर शो – वायूदलाच्या कसरतींनी नाशिककर मंत्रमुग्ध
नाशिकमधील गंगापूर धरणाच्या परिसरात भारतीय वायू दलाच्या जगप्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने आपल्या कसरती सादर केल्या. या टीमने आपल्या विमानांच्या मदतीने नाशिकच्या आकाशात रंगांची उधळण करत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले. कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वीच परिसरात देशभक्तीपर गीतांमुळे चैतन्य निर्माण झाले होते. पोलीस दलाच्या बँड पथकाने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांमध्ये उत्साह भरला. फ्लाईट लेफ्टनंट कवल संधू यांनी या सर्व प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन करून नागरिकांना प्रत्येक कृतीची तांत्रिक माहिती दिली. विमानांच्या प्रत्येक कसरतीनंतर भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी गंगापूर धरण परिसर दुमदुमून गेला होता.
हॉक एकशे बत्तीस या नऊ विमानांच्या ताफ्याने आकाशात झेप घेताच नाशिककरांच्या उत्साहाला उधाण आले. स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, विंग कमांडर जसबीर सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कमी अंतरावरून विमान चालवत थरारक कसरती सादर केल्या. सूर्यकिरण टीमने अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा धूर सोडत ही प्रात्यक्षिक सादर केली. या प्रात्यक्षिकांमध्ये केवळ रंगांची उधळण नव्हती, तर अचूकता आणि साहसाचा अजोड संगम होता. विमानांनी आकाशात विविध अक्षरे तसेच प्रतिकृती साकारल्या.
नाशिक जिल्हा प्रशासनाने या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती. एअर शो सुरू होण्यापूर्वी ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी नौकानयनाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या एरोबॅटिक शोमुळे नाशिकच्या तरुणांमध्ये देशसेवेची ओढ निर्माण होईल आणि ते सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रवृत्त होतील. हा सोहळा म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनाची एक प्रकारे पूर्वतयारीच आहे, असे मत यावेळी मंत्री भुसे यांनी व्यक्त केले.