लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने सुरू केली हेल्पलाईन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसी प्रक्रियेतील चुकांमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी, आता १८१ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या सुविधेची घोषणा करत, महिलांना आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी या क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांकडून तांत्रिक चुका झाल्याचे समोर आले आहे. ई-केवायसी करताना काही लाभार्थ्यांनी चुकून चुकीचे पर्याय निवडले, ज्यामुळे त्यांचे लाभ तात्पुरते स्थगित झाले आहेत. अशा तक्रारी विभागाकडे मोठ्या संख्येने प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एकशे एक्याऐंशी क्रमांकावर उपलब्ध असलेल्या कॉल सेंटर ऑपरेटर्सना या योजनेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती, बँक खाते जोडणी आणि तांत्रिक त्रुटींबाबत येथे सविस्तर माहिती मिळेल. आता महिलांना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही,त्या थेट फोनवरून आपल्या समस्या मांडू शकतील.
केवळ डिजिटल स्तरावर नव्हे, तर जमिनी स्तरावरही या योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या महिलांच्या अर्जात किंवा ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, अशा लाभार्थ्यांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका संबंधित महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या कागदपत्रांची आणि अर्जातील माहितीची खातरजमा करतील. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांचा हक्क डावलला जाणार नाही, याची खात्री केली जाईल. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतर ज्यांचे अर्ज अडकले आहेत, त्यांना या पडताळणी प्रक्रियेचा मोठा फायदा होणार आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, त्यांच्या आरोग्यात आणि पोषण आहारात सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.