यंदा तीन नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित गृह मंत्रालयाचा चित्ररथ

भारताच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये यंदा एक विशेष आकर्षण असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालय देशात लागू केलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित एक विशेष चित्ररथ सादर करणार आहे. दंडाकडून न्यायाकडे जाणारा भारताचा प्रवास आणि वसाहतकालीन कायदे मोडीत काढून भारतीय न्यायव्यवस्था अधिक सक्षम कशी झाली, याचे दर्शन या चित्ररथातून घडवले जाणार आहे.

भारतात एक जुलै २०२४ पासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. या कायद्यांचे महत्त्व आणि त्यातील आधुनिकता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गृह मंत्रालयाने या संकल्पनेची निवड केली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन कायद्यांना या चित्ररथात ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे.  या चित्ररथाची रचना अत्यंत आधुनिक आणि संदेश देणारी आहे. नवीन कायद्यांतर्गत गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ई-साक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष आणि फॉरेन्सिक तपासाचे महत्त्व चित्ररथात दाखवण्यात येईल. नवीन कायद्यांमध्ये महिला आणि बालकांशी संबंधित गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पीडित-केंद्रित न्यायव्यवस्थेचे चित्र यात स्पष्टपणे मांडले जाईल. न्याय मिळण्यास होणारा विलंब टाळून वेळेत निकाल देण्याची प्रक्रिया या कायद्यांमुळे कशी वेगवान झाली आहे, हे विविध प्रतिकृतींच्या माध्यमातून दाखवले जाईल.

यंदाच्या संचलनाची मुख्य संकल्पना, विकसित भारत आणि भारत ही लोकशाहीची जननी यावर आधारित आहे. गृह मंत्रालयाचा हा चित्ररथ भारताला प्रगत आणि सुरक्षित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून सादर केला जात आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या या प्रदर्शनामुळे केवळ देशातील नागरिकांमध्येच नाही, तर जगालाही भारताच्या बदलत्या आणि सुधारित कायदे व्यवस्थेची माहिती मिळणार आहे. या नवीन कायद्यांमुळे पोलिसांची कार्यपद्धती आणि सामान्यांचे हक्क अधिक सुरक्षित झाले आहेत, हा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.






25,066 वेळा पाहिलं