
मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचे शहर मानले जाते. मात्र, इतकी प्रगत यंत्रणा असूनही शहरातील सर्व बालकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात अपयश येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचा डेटा आणि विविध सर्वेक्षणांनुसार, अनेक बालके पहिल्या काही लसी घेतात, मात्र त्यानंतर लसीकरणाच्या प्रक्रियेतून बाहेर पडतात, ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
लसीकरणाची सद्यस्थिती आणि आकडेवारी मुंबई महानगरपालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या नियमित लसीकरण मोहिमेत गोवर, रुबेला, पोलिओ आणि बीसीजी सारख्या महत्त्वाच्या लसींचा समावेश आहे. मात्र, शहरातील झोपडपट्टी बहुल भाग आणि काही विशिष्ट वस्त्यांमध्ये पूर्ण लसीकरणाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंतच पूर्ण लसीकरण गाठले जाते. पहिल्या डोससाठी मोठ्या प्रमाणावर पालक येतात, मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोसच्या वेळी हे प्रमाण घटते. विशेषतः दीड वर्ष आणि पाच वर्षांनंतर दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या बाबतीत उदासीनता अधिक दिसून येते.
शहरात आरोग्य सुविधांची कमतरता नसून, सामाजिक आणि भौगोलिक आव्हाने अधिक आहेत. मुंबईत कामगार वर्गाचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. एका भागातून दुसऱ्या भागात किंवा गावी गेल्यामुळे लसीकरणाची साखळी तुटते. काही समुदायांमध्ये लसीकरणामुळे ताप येतो किंवा भविष्यात दुष्परिणाम होतात, असे गैरसमज अद्यापही कायम आहेत. यामुळे पालक लसी देण्यास टाळाटाळ करतात. हातावर पोट असलेल्या पालकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहणे किंवा वेळ काढणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. लसीकरण कार्ड हरवणे किंवा पुढील डोसची तारीख विसरणे, हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने पालिका आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्व्हे करतात, मात्र दुर्गम झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. तसेच, मुंबईतील खाजगी डॉक्टरांकडे जाणाऱ्या मुलांच्या लसीकरणाची माहिती अनेकदा पालिकेच्या मुख्य डेटाबेसमध्ये वेळेवर अपडेट होत नाही, ज्यामुळे आकडेवारीत तफावत निर्माण होते.
गेल्या काही वर्षांत मुंबईतील गोवंडी, कुर्ला आणि मानखुर्द या भागांत गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. याचे मुख्य कारण अपूर्ण लसीकरण हेच होते. ज्या मुलांनी गोवर-रुबेलाचा किमान एक डोस चुकवला होता, त्यांना या आजाराची लागण जलद गतीने झाली. यामुळे लसीकरण मोहिमेतील त्रुटींचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता मिशन इंद्रधनुष सारख्या मोहिमा अधिक तीव्र केल्या आहेत. यु-विन पोर्टलद्वारे प्रत्येक मुलाचा ट्रॅकिंग आयडी तयार केला जात आहे. स्थानिक धर्मगुरू आणि प्रभावी व्यक्तींच्या माध्यमातून लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोकरी करणाऱ्या पालकांसाठी संध्याकाळच्या वेळी किंवा सुट्टीच्या दिवशी विशेष लसीकरण सत्रांचे नियोजन केले जात आहे.