प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे एसटी बसच्या सर्व चालकांची कामावर येण्यापूर्वी दररोज मद्यचाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुण्यात एका आढावा बैठकीदरम्यान हे आदेश दिले आहेत.
एसटीमधून दररोज लाखो प्रवासी या बसने प्रवास करतात. मात्र, गेल्या काही काळापासून एसटी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून, काही घटनांमध्ये चालकाने मद्यपान केल्याचे समोर आले होते. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा ही सरकारची जबाबदारी आहे. चालक जर नशेत गाडी चालवत असेल, तर तो केवळ स्वतःचाच नाही तर शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घालतो. त्यामुळे आता प्रत्येक आगारात चालकाची ड्युटी सुरू होण्यापूर्वी तपासणी केली जाईल, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक चालकाला ड्युटीवर हजर होताना ब्रेथ अॅनालायझर चाचणीतून जावे लागेल. एखादा चालक मद्यप्राशन केल्याचे आढळले, तर त्याला तत्काळ निलंबित केले जाईल आणि त्याच्यावर विभागीय चौकशी बसवण्यात येईल. ही चाचणी सुरळीत पार पडते की नाही, याची जबाबदारी संबंधित आगार प्रमुखांची असेल. यात हलगर्जीपणा आढळल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. पुणे हे राज्याचे महत्त्वाचे वाहतूक केंद्र असल्याने या मोहिमेची तीव्रता पुण्यात अधिक असेल. पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन यांसारख्या मोठ्या स्थानकांवर आधुनिक मद्यचाचणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या चालकांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. केवळ चाचण्याच नव्हे, तर एसटी गाड्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेबाबतही परिहवन मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. जुन्या झालेल्या गाड्या बदलणे, गाड्यांची वेळेवर दुरुस्ती करणे आणि प्रवाशांना बसस्थानकावर मूलभूत सुविधा पुरवणे यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.