नव्या शैक्षणिक धोरणानुसार डिजिटल अभ्यासक्रमावर भर

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती, अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती संस्थेने आपल्या प्रवासाच्या साठाव्या वर्षात पाऊल ठेवले आहे. या हिरक महोत्सवी वर्षाचा शानदार शुभारंभ पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी बालभारतीला अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बालभारती आता केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता काळानुरूप बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आता अभ्यासक्रमात कृषी, आरोग्य, क्रीडा आणि अध्यात्म यांसारख्या विषयांचा समावेश केला जाणार आहे. छापील पुस्तकांसोबतच ई-बुक्स, डिजिटल पाठ्यपुस्तके, क्यूआर कोड आणि ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपातील शैक्षणिक साहित्यावर भर दिला जाईल. केवळ घोकंपट्टी न करता विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी शैक्षणिक साधने विकसित करण्यात येत आहेत. २७ जानेवारी १९६७ रोजी कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार स्थापन झालेली बालभारती आज दीड हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणारी देशातील एक अग्रगण्य संस्था बनली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दू आणि कन्नड अशा दहा विविध भाषांमध्ये पुस्तकांची निर्मिती केली जाते. गणित, विज्ञानापासून ते कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणापर्यंत एकूण सोळा विषयांचे अभ्यासक्रम येथे विकसित होतात. गेली एकोणसाठ वर्षे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडतील अशा दरात संस्कारक्षम पुस्तके पोहोचवण्याचे काम बालभारतीने केले आहे.

इयत्ता पहिलीची नवीन पाठ्यपुस्तके २०२५ मध्ये प्रकाशित झाली असून, आता २०२६-२७ या वर्षासाठी दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांचे लेखन सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र आरोग्य पत्रिका तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. शालेय स्तरावरच विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यावर भर दिला जात आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बालभारतीच्या किशोर या लोकप्रिय मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, बालभारतीची नवी ओळख सांगणाऱ्या बालभारती गीताचे अनावरणही करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रफितीद्वारे संस्थेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बालभारतीचा हा हिरक महोत्सव महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






7,586 वेळा पाहिलं