पुणे विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या
पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या विधी आणि एमबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शासकीय दुखवटा जाहीर केल्यामुळे आज सुट्टी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बारामतीतील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि अनेक विद्यार्थी तसेच कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता विचारात घेऊन, प्रशासकीय स्तरावर हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा बदल आवश्यक होता.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या नियोजित विषयांच्या परीक्षा, एमबीए सत्र परीक्षांचे काही महत्त्वाचे पेपर यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या परीक्षा आज होणार होत्या, पण शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार या परीक्षा आता तीन फेब्रुवारीला होणार आहेत. विद्यापीठाने तातडीने सोशल मीडिया आणि अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसारित केली.
विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पुणे विद्यापीठाच्या परिक्षा विभागामधील अधिकृत माहिती तपासावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी केले आहे. सुधारित तारखांचे हॉल तिकीट किंवा बैठक व्यवस्था यांमध्ये कोणताही मोठा बदल नसेल, केवळ परीक्षेची तारीख आणि वेळ बदललेली असेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. केवळ एक किंवा दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. यामुळे संपूर्ण निकालाच्या प्रक्रियेवर किंवा पुढील सत्राच्या सुरुवातीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. उर्वरित सर्व परीक्षा आधीच ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. परीक्षा अचानक पुढे ढकलल्यामुळे, केंद्रावर पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः ग्रामीण भागातून किंवा लांबून आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. परीक्षा पुढे ढकलल्याने अभ्यासाला थोडा जास्त वेळ मिळाला असला, तरी नियोजित वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवासाचे नियोजन पुन्हा करावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया एका विधी शाखेच्या विद्यार्थ्याने दिली.