मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या सुधारणेसाठी महापालिकेचा मोठा प्रकल्प

मुंबईकरांना पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांमधील पाणी वितरणाची यंत्रणा आधुनिक केली जाणार आहे.

मुंबईला दररोज सुमारे चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणी मिळणे, दूषित पाणी किंवा गळती अशा तक्रारी वारंवार येतात. विशेषतः पश्चिम उपनगरातील गोरेगाव ते दहिसर या पट्ट्यात लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलणे आणि नवीन तंत्रज्ञान वापरणे आवश्यक झाले आहे. या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वॉटर मीटर्स आणि झोनल प्रेशर मीटर्सची स्थापना हे आहे. अनेकदा उंच भागात राहणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. हे प्रेशर मीटर्स पाण्याचा दाब मोजतील आणि जिथे दाब कमी आहे, तिथे तांत्रिक सुधारणा करण्यास मदत करतील. मुंबईत एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे चौतीस टक्के पाणी गळती किंवा चोरीमुळे वाया जाते. नवीन मीटरिंग सिस्टीममुळे नेमकी गळती कुठे आहे, हे शोधणे सोपे होईल.

यासोबतच महापालिकेने अमर महल ते ट्रॉम्बे आणि मालाड ते कांदिवली अशा विविध भागांत भूमिगत जलबोगद्यांचे काम हाती घेतले आहे. सत्तर वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तानसा जलवाहिनीच्या जागी नवीन दोन हजार सातशे पन्नास मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे वहनक्षमता वाढून पाणीपुरवठा अधिक सुरक्षित होईल. गोराई आणि चारकोप येथील जलाशयांमध्ये नवीन पंप बसवून पाणी साठवण आणि वितरणाची क्षमता वाढवली जात आहे. पश्चिम उपनगरातील दहिसर, मागाठाणे आणि कांदिवली येथील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन, तिथे नवीन जंक्शन जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्वे आणि मालाडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सोळा हजार तीनशे मीटर लांबीच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे आहे. त्यासाठी पाण्याचे परिक्षण केले जात आहे. तसेच, भविष्यात पिंजाळ आणि दमणगंगा प्रकल्पांतून अतिरिक्त पाणी मिळवण्याचे नियोजन आहे.






11,604 वेळा पाहिलं