सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री – पंतप्रधानांकडून कौतुक
राज्यात महायुती सरकारने सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. शनिवारी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी शपथ घेतली. या निवडीचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्या सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नाहीत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत त्यांना निवडून येणे अनिवार्य आहे. अजित पवारांच्या रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून त्या निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच क्रीडा आणि युवक कल्याण तसेच महिला व बालविकास ही खाती सोपवली जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थमंत्रालय तूर्तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार आहेत, जेणेकरून आगामी अर्थसंकल्पाची प्रक्रिया विनाव्यत्यय पार पडेल. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत अनेक दिग्गज नेते उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, मात्र एकाही महिलेला या पदापर्यंत पोहोचता आले नव्हते. सुनेत्रा पवार यांनी ही सहासष्ट वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीला मोठी मदत होऊ शकते.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. पक्षाची पकड कायम राखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी पहिल्या महिलेची निवड झाल्यानंतर पंतप्रधांनांनी त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सुनेत्रा पवारजी यांचे हार्दिक अभिनंदन. ही केवळ एका पदाची व्याप्ती नसून, महाराष्ट्राच्या महान परंपरेत महिलांच्या कर्तृत्वाला मिळालेला सन्मान आहे. त्यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक अनुभवाचा राज्याला निश्चितच फायदा होईल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले.