मुंबईतील हवा विषारी – नेत्रविकारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक गेले काही दिवस वारंवार वाईट ते अत्यंत वाईट श्रेणीत जात आहे. यामुळे मुंबईकरांच्या डोळ्यांच्या तक्रारींमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. डोळे सतत उघडे राहत असल्याने ते हवेतील सूक्ष्म कणांच्या थेट संपर्कात येतात, यामुळे डोळ्यांचे गंभीर आजार बळावत आहेत.
प्रदूषणामुळे डोळ्यांतील ओलावा वेगाने कमी होतो आहे. यामुळे डोळ्यांत काहीतरी खुपल्यासारखे वाटणे, जळजळ होणे आणि थकवा जाणवणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. हवेतील धुलीकण आणि धुरामुळे डोळे लाल होणे, खाज सुटणे आणि सतत पाणी येणे या समस्या उद्भवतात. प्रदूषित कणांमुळे डोळ्यांच्या पारदर्शक पडद्यावर जखमा किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. डोळ्यांच्या पृष्ठभागावरील दाह वाढल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दृष्टी धूसर होऊ शकते. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका दुपचाकीस्वारांना, लहान मुले आणि वृद्धांना बसत आहे. वाऱ्याच्या वेगामुळे आणि धुरामुळे दुचाकी चालवणाऱ्यांचे डोळे थेट प्रदूषणाच्या संपर्कात येतात. तर मुलांच्या डोळ्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना संसर्ग लवकर होतो. लेन्सवर प्रदूषित कण चिकटल्यामुळे डोळ्यांना जखम होण्याची शक्यता जास्त असते. वाहतूक पोलीस, सुरक्षा रक्षक आणि बांधकाम मजूर यांना नेत्रविकाराचा त्रास होतो आहे.
नेत्ररोग तज्ज्ञांनी, मुंबईकरांना डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बाहेर पडताना डोळ्यांना पूर्णपणे झाकणारा चष्मा किंवा गॉगल वापरावा. डोळ्यांत खाज आल्यास किंवा काही गेल्याचे वाटल्यास डोळे चोळू नका, यामुळे बुबुळाला इजा होऊ शकते. बाहेरून आल्यावर डोळे स्वच्छ आणि थंड पाण्याने अलगद धुवावेत. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा, जेणेकरून डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा टिकून राहील. आधीच प्रदूषणामुळे ताणलेल्या डोळ्यांवर मोबाईल किंवा लॅपटॉपचा अतिरिक्त ताण देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.