सशस्त्र दलातील दिव्यांगांच्या पेन्शनवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
सशस्त्र दलातील जवानांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्पॉन्डिलायटिस यांसारख्या आजारांमुळे अपंगत्व येते. अशा जवानांना निवृत्तीवेतन नाकारणाऱ्या केंद्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारने दाखल केलेल्या सुमारे सत्तर याचिका फेटाळून लावल्या. मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब हे जीवनशैलीशी संबंधित किंवा जन्मजात आजार आहेत. त्यामुळे त्यांचा लष्करी सेवेशी थेट संबंध नसल्याचा दावा करत मेडिकल बोर्डाने अनेक जवानांचे पेन्शन नाकारले होते. मात्र, एखादा जवान सेवेत दाखल होताना निरोगी असेल आणि सेवेदरम्यान त्याला हे आजार जडले असतील, तर ते सेवेमुळेच उद्भवले आहेत असे मानले जावे, असे स्पष्ट करत न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आहे.
न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की, एखादा आजार लष्करी सेवेमुळे झालेला नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची आहे, जवानाची नाही. एखाद्या जवानाला लष्करी कर्तव्याच्या कठीण परिस्थितीमुळे उच्च रक्तदाब झाला आहे, हे सिद्ध करणे त्याच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत नियमांचा अर्थ हा जवानांच्या हितासाठी लावला पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले. पेन्शन ही सरकारच्या मर्जीवर अवलंबून असलेली देणगी किंवा बक्षिसी नाही. तो कर्मचाऱ्याचा हक्काचा मौल्यवान अधिकार आहे. पेन्शन म्हणजे केवळ भूतकाळातील निष्ठेचा मोबदला नसून, उतारवयात जेव्हा शारीरिक आणि मानसिक शक्ती कमी होते, तेव्हा आर्थिक सुरक्षा देणारा तो एक सामाजिक-आर्थिक न्यायाचा भाग आहे. लष्करी जवानांना मिळणारे अपंगत्व निवृत्तीवेतन हे त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने मांडले आहे.
मेडिकल बोर्डाचे मत हे कायदेशीर छाननीच्या पलीकडे नाही. जर बोर्डाने दिलेले कारण अतार्किक किंवा अपुरे असेल, तर सशस्त्र दल न्यायाधिकरण त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. ज्या जवानांना वीस टक्क्यांहून अधिक अपंगत्व आले आहे आणि ते वैद्यकीय कारणास्तव सेवेतून बाहेर पडले आहेत, ते सर्व पेन्शनसाठी पात्र आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निकालामुळे अशा हजारो माजी सैनिकांना दिलासा मिळाला आहे ज्यांना केवळ शांततेच्या ठिकाणी तैनात असताना आजार झाला, या तांत्रिक कारणावरून पेन्शन नाकारले होते. आता मधुमेह, स्पॉन्डिलायटिस, दृष्टीदोष आणि मानसिक तणावासारख्या आजारांनी ग्रस्त जवानांनाही त्यांचे हक्काचे निवृत्तीवेतन मिळणार आहे.