
दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध क्रुगर राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या दहा दिवसांत या परिसरात वर्षभराच्या सरासरी इतका पाऊस पडल्याने भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. हा पाऊस केवळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित हवामान बदलामुळे याची तीव्रता तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढली आहे, असे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे या राष्ट्रीय उद्यानाचे मोठे नुकसान झाले आहे.
जानेवारीच्या मध्यात सुरू झालेल्या या पावसामुळे क्रुगर राष्ट्रीय उद्यानातील नद्यांना २००१ नंतरचा सर्वात मोठा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे उद्यानातील अनेक पूल वाहून गेले असून मुख्य रस्ते खचले आहेत. यामुळे उत्तरेकडील अनेक पर्यटन कॅम्प्सचा संपर्क तुटला आहे. पंधराहून अधिक टुरिस्ट कॅम्प्स बंद करण्यात आले असून, अडकलेल्या सहाशेहून अधिक पर्यटक आणि कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने उद्यानात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पुरात झालेल्या नुकसानीची भरपाई आणि रस्ते-पुलांच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीस दशलक्ष डॉलर्स खर्च येईल, असा अंदाज दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण मंत्र्यांनी वर्तवला आहे.
प्राणी नैसर्गिक उपजत बुद्धीने उंच भागाकडे स्थलांतर करतात, त्यामुळे प्राण्यांच्या जीवितहानीची शक्यता कमी असली तरी पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे, असे मत प्राणी तज्ञांनी मांडले आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे मगरी आणि पानघोडे नद्यांच्या पात्राबाहेर पडून रहिवासी भागांजवळ पोहोचले आहेत, ज्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुराच्या पाण्यामुळे उद्यानातील अनेक वैज्ञानिक उपकरणे आणि ‘कॅमेरा ट्रॅप्स’ वाहून गेले आहेत, ज्यामुळे वन्यजीव संशोधनात अडथळे आले आहेत. दक्षिण आफ्रिका सरकारने उद्यानाच्या दुरुस्तीसाठी आणि आधुनिकीकरणासाठी क्रुगर रिकव्हरी फंड स्थापन केला आहे. हा निधी केवळ रस्ते बांधण्यासाठीच नव्हे, तर उद्यानाला भविष्यातील हवामान बदलाशी लढण्यासाठी अधिक सक्षम करण्यासाठी वापरला जाईल.