अमेरिकेला अतिथंड वाऱ्यांचा तडाखा – जनजीवन विस्कळीत

उत्तर ध्रुवावरून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये भीषण थंडी आणि हिमवादळाचे सावट निर्माण झाले आहे. न्यूयॉर्क आणि बोस्टन यांसारखी प्रमुख शहरे बर्फाच्या जाड थराखाली गाडली गेली असून, रस्ते आणि हवाई वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. या हवामानामुळे पर्यटनाला मोठा फटका बसला असून हजारो प्रवाशी विमानतळावरच अडकलेत.

या आर्क्टिक ब्लास्टमुळे ईशान्य अमेरिकेतील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी, बोस्टनमधील लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणारी शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानांच्या इंजिनवर आणि पंखांवर बर्फ साचल्याने डि-आइसिंग प्रक्रियेला विलंब होत असून, धावपट्टीवरील दृश्यमानता शून्य झाली आहे. न्यूयॉर्क आणि बोस्टनला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांवर बर्फाचे थर साचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. अमट्रॅकसह अनेक स्थानिक रेल्वे सेवांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, काही मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.

या वादळाचा सर्वात मोठा धोका म्हणजे केवळ बर्फवृष्टी नसून, त्यासोबत येणारी प्राणघातक थंडी ही आहे. बोस्टन आणि न्यूयॉर्कमध्ये तापमान उणे दहा ते उणे वीस अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ही थंडी उणे तीस अंशांपेक्षा जास्त भासत आहे. नागरिकांना कडाक्याच्या थंडीमुळे फ्रॉस्टबाइट होण्याचा इशारा दिला असून, उघड्या त्वचेवर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत याचा परिणाम होऊ शकतो, अशा इशारा राष्ट्रीय हवामान खात्याने दिला आहे.  हवामान तज्ज्ञांच्या मते, हे वादळ बॉम्ब सायक्लोनचे रूप धारण करत आहे. जेव्हा हवेचा दाब चोवीस तासांत वेगाने कमी होतो, तेव्हा हे भीषण वादळ तयार होते. यामुळे किनारपट्टीच्या भागात लाटांचे प्रमाण वाढले असून न्यूयॉर्कच्या सखल भागात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फेब्रुवारी महिना हा पर्यटनासाठी महत्त्वाचा असतो, मात्र या कडाक्याच्या थंडीमुळे पर्यटन व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. हॉटेल्सचे बुकिंग रद्द झाले असून, प्रेक्षणीय स्थळे पर्यकांसाठी बंद करण्यात आली आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांनी प्रवाशांना त्यांचे बुकिंग बदलण्यासाठी मोफत सवलती देण्यास सुरुवात केली आहे. न्यूयॉर्क आणि मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नरांनी आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. बेघर लोकांसाठी वॉर्मिंग सेंटर्स उघडण्यात आली आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही समोर येत असून, हजारो कर्मचारी दुरुस्तीच्या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत.






10,623 वेळा पाहिलं