हवामान बदलाचा मासेमारीला फटका – उरणमधील मासळीची आवक घटली

जागतिक हवामान बदल आणि अरबी समुद्रातील बदलत्या नैसर्गिक स्थितीचा थेट परिणाम कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर होऊ लागला आहे. उरणमधील करंजा आणि मोरा यांसारख्या प्रमुख बंदरांमध्ये मासळीच्या आवकेत मोठी घट झाली असून, याचा फटका मच्छीमार आणि खवय्ये अशा दोघांनाही बसत आहे. मागील दोन आठवड्यांत मासळीच्या दरात पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वाढलेले वादळी वारे आणि हवेतील अनपेक्षित बदलांमुळे मासेमारीच्या बोटींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारी हा महिना मासेमारीसाठी उत्तम मानला जातो, परंतु यंदा समुद्राच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे मासळी खोल समुद्रात किंवा तळाला जात आहे. त्यामुळे जाळ्यात अडकणाऱ्या मासळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मच्छीमारांना खोल समुद्रातील एका फेरीसाठी डिझेल, बर्फ, खलाशांचा पगार आणि रसद यांवर सुमारे तीन ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, पुरेसा मासा मिळत नसल्याने अनेक बोटींचा हा खर्चही निघणे कठीण झाले आहे. उरणच्या करंजा बंदरातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बोटी आठ ते दहा दिवसांच्या प्रवासानंतर केवळ वीस ते तीस टक्के माल घेऊन परतत आहेत, ज्यामुळे प्रत्येक फेरीमागे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आवक घटल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये मासळीचे दर कडाडले आहेत. विशेषतः खवय्यांच्या आवडीचे मासे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत. पापलेटची आवक कमी झाल्याने दर आठशे ते बाराशे रुपयांच्या वर गेले आहेत. सुरमई आणि कोळंबी यांच्या दरातही प्रति किलो दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. बोंबील आणि मांदेली हे मध्यमवर्गीयांचे हे परवडणारे मासेही आता महाग झाले आहेत.

केवळ हवामान बदलच नव्हे, तर उरण परिसरातील वाढते औद्योगिकीकरण आणि समुद्रात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी यामुळेही मत्स्यसंपदा धोक्यात आली आहे. जेएनपीटी बंदर, शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक आणि इतर प्रकल्पांमुळे खाडी परिसरातील खारफुटी नष्ट झाली असून, माशांच्या प्रजननावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. एकशे पंचवीसहून अधिक असलेल्या माशांच्या प्रजाती आता केवळ पंच्याहत्तर ते ऐंशीवर आल्याचे ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन’च्या अहवालातून समोर आले आहे. करंजा बंदरात साचलेला प्रचंड गाळ ही मच्छीमारांसमोरची दुसरी मोठी समस्या आहे. ओहोटीच्या वेळी सुमारे तीनशे बोटी गाळात अडकून पडतात, ज्यामुळे मासे विक्रीसाठी वेळेवर बाजारात आणता येत नाहीत. याचाही परिणाम एकूण उलाढालीवर होत आहे.






6,636 वेळा पाहिलं