समृद्धी महामार्गावर वाशीम – बुलढाणा जिल्ह्यात वाहतूक तात्पुरती बंद
महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महामार्गावर सुरक्षा आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थापनासाठी हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत लोखंडी कमान उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील महामार्गाच्या पट्ट्यात सात फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ठराविक वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवले जात आहे. या अंतर्गत महामार्गाच्या वरच्या बाजूला लोखंडी गॅन्ट्री उभारल्या जाणार आहेत. या गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे, वेगमर्यादा दर्शवणारे फलक आणि इतर तांत्रिक उपकरणे बसवली जातात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. हे काम अत्यंत जोखमीचे आणि अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करावे लागत असल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या त्या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबवणे आवश्यक असते. हे काम प्रामुख्याने वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातून जाणा-या महामार्गादरम्यान होणार आहे. यामध्ये कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव आणि मेहकर तालुका या ठिकाणांचा समावेश आहे. सात फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी २०२६ दरम्यान एकूण पस्तीस टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाईल.
या काळात दररोज ठराविक वेळी वाहतूक थांबवण्यात येईल. प्रामुख्याने रात्री बारा ते पहाटे एक वाजेपर्यंत आणि दुपारी तीन ते चार या कालावधीत वाहतूक सुमारे पंचेचाळीस मिनिट ते साठ मिनिटांसाठी पूर्णतः बंद राहील. मुंबईकडे जाणारा मार्ग आणि नागपूरकडे जाणारी मार्ग अशा दोन्ही बाजूंनी टप्प्याटप्प्याने हा ब्लॉक घेतला जाईल. गॅन्ट्री उभारणीचे काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाणार आहे. मात्र, या पंचेचाळीस ते साठ मिनिटांच्या काळात महामार्गावर वाहनांच्या रांगा लागू शकतात. वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या वेळेचा विचार करावा, शक्य असल्यास प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, प्रवासादरम्यान महामार्ग प्रशासन, वाहतूक पोलीस आणि लावण्यात आलेल्या सूचना फलकांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना वाहनचालकांना देण्यात आल्या आहेत.
समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्यासाठी हे काम केले जात असून, प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अकरा फेब्रुवारीपर्यंत मुंबई आणि विदर्भाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर प्रवाशांनी विशेष खबरदारी घ्यावी.