बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मोठा टप्पा पार – पालघरमध्ये बोगद्याचे खोदकाम पूर्ण

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने पालघर जिल्ह्यात एक महत्त्वाचे यश संपादन केले आहे. डहाणू रोड परिसरातील कठीण डोंगराळ भागात असलेल्या माउंटन टनेल-सहा या बोगद्याचे खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याची पाहणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट केली.

पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या या अतिजलद रेल कॉरिडॉरमध्ये एकूण सात पर्वतीय बोगदे प्रस्तावित आहेत. त्यापैकी डहाणू येथील हा चारशे चोपन्न मीटर लांबीचा बोगदा पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होते. येथील भौगोलिक गुंतागुंत आणि कठीण पाषाण लक्षात घेता, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे नियंत्रित स्फोट आणि अचूक ड्रिलिंगच्या साहाय्याने केवळ बारा महिन्यांत हे काम पूर्ण झाले. हा बोगदा चौदा पूर्णांक चार मीटर रुंद असून, यामध्ये बुलेट ट्रेनचे येणारे आणि जाणारे दोन्ही ट्रॅक सामावले जाणार आहेत. खोदकामादरम्यान कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. रिअल-टाइम मॉनिटरिंग, अत्याधुनिक वायुविजन आणि अग्निशमन यंत्रणांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. या यशाबद्दल रेल्वे मंत्र्यांनी प्रकल्पातील अभियंते आणि कामगारांचे विशेष कौतुक केले.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेताना महत्त्वाची माहिती दिली. आतापर्यंत तीनशे चौतीस किमी लांबीचे पूल आणि चारशे सतरा किमीचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. गुजरात भागात ट्रॅक टाकण्याचे काम जोमाने सुरू असून पाच हजार चारशेहून अधिक ओव्हरहेड इलेक्ट्रिक मास्ट लावले गेले आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या भूमिगत बोगद्यापैकी पाच किमीचे उत्खनन पूर्ण झाले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मधील तरतुदींचा उल्लेख करत वैष्णव यांनी सांगितले की, देशात आणखी सात नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. यामुळे पुणे ते हैदराबाद हा प्रवास अवघ्या एक तास पंचावन्न मिनिटांत शक्य होईल. चेन्नई ते बेंगळुरू हे अंतर केवळ एक तास तेरा मिनिटांत पार होईल. मालवाहतूक कॉरिडॉरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाढवण बंदर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या अंतर्गत भागांशी जोडले जाईल, ज्यामुळे व्यापार वृद्धी होईल.






17,518 वेळा पाहिलं