रामायण – हनुमान जयंतीला दिसणार पहिली झलक

भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा एक महाप्रकल्प सध्या आकाराला येतोय तो म्हणजे नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’. या महाकाव्याची चर्चा सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता तो म्हणजे आधुनिक काळातील प्रभू श्रीराम नक्की कसे दिसणार? आता या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची घटिका जवळ आली असून येत्या हनुमान जयंतीच्या पावन मुहूर्तावर म्हणजे येत्या २ एप्रिल २०२६ रोजी प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरची पहिली झलक (Trailor) जगासमोर येणार आहे.

आपल्या लाडक्या प्रभू रामाच्या जन्मोत्सवानंतर निर्मात्यांनी हा खास ‘फर्स्ट लुक’ प्रदर्शित करण्याचा घेतलेला निर्णय चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. रणबीर कपूरने या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. केवळ शरीरयष्टी कमावणे नव्हे तर श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातील तो संयम, डोळ्यांतील करुणा आणि चेहऱ्यावरील सात्विक तेज पडद्यावर जिवंत करण्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली आहे.

या भूमिकेची पवित्रता जपण्यासाठी रणबीरने त्याच्या आवाजातील गांभीर्य आणि संवादांमधील स्पष्टता यावर त्याने घेतलेले परिश्रम या पहिल्या झलकीतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील. प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीरला पाहणे, हा भारतीय प्रेक्षकांसाठी केवळ एक अभिनय नसून तो एक भावनिक अनुभव असणार आहे.

या चित्रपटाची भव्यता केवळ नावापुरती मर्यादित नसून त्यातील कलाकारांची निवडही तितकीच ताकदीची आहे. रणबीर कपूर ‘राम’ तर दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ‘सीता’ मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. या जोडीसोबतच ‘केजीएफ’ फेम सुपरस्टार यश हा ‘रावण’ ही आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे, ज्यामुळे पडद्यावरचा हा धर्म-अधर्माचा लढा अधिकच रोमहर्षक होईल. याशिवाय सनी देओल ‘हनुमान’ आणि लारा दत्ता ‘कैकेयी’च्या भूमिकेत दिसण्याची चर्चा असून अशा दिग्गज कलाकारांमुळे हा चित्रपट जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचा डंका वाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.


तांत्रिकदृष्ट्या ही कलाकृती अत्यंत समृद्ध असून, जागतिक दर्जाचे दृश्य परिणाम (VFX) आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत यावर विशेष काम केले जात आहे. ‘दंगल’ सारखा दर्जेदार चित्रपट देणाऱ्या नितेश तिवारींची ही दृष्टी नव्या पिढीला रामायणाची महान गाथा एका वेगळ्या उंचीवर नेऊन दाखवेल, अशी खात्री वाटते. हनुमान जयंतीला प्रदर्शित होणारी ही पहिली झलक केवळ चित्रपटाची प्रसिद्धी नसून, ती भारतीय संस्कृतीच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात असेल. रणबीर कपूरला प्रभू रामांच्या रूपात पाहण्यासाठी आता संपूर्ण देश सज्ज झाला असून, ही ‘पहिली झलक’ सोशल मीडियावर नवा विक्रम प्रस्थापित करेल यात शंका नाही.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,525 वेळा पाहिलं