
राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात वाळवंटी प्रदेशात भीषण गारपीट झाली आहे. संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झाला आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या या नैसर्गिक बदलामुळे बिकानेरमधील तापमान अचानक तीस अंश सेल्सिअसच्या खाली आले. शक्तिशाली पश्चिमी विक्षोभमुळे बिकानेर, श्रीगंगानगर आणि जैसलमेर परिसरात ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहत होते. त्यानंतर झालेल्या मुसळधार गारपिटीने अवघ्या काही मिनिटांत शेते, रस्ते आणि घरांची छपरे बर्फाने झाकून गेली. एका वनविभागाच्या अधिकाऱ्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, वाळवंटातील वाळूऐवजी सगळीकडे फक्त बर्फाची पांढरी चादर दिसत आहे.
बिकानेर परिसरात सध्या गहू, मोहरी आणि हरभरा या पिकांची काढणी सुरू आहे. या भीषण गारपीटीमुळे ही पिके जमिनीदोस्त झाली आहेत. जैसलमेर आणि बिकानेरच्या काही भागांत ईसबगोल आणि जिऱ्याचे पीक घेतले जाते. ओलाव्यामुळे आणि गारांच्या माऱ्यामुळे या पिकांचे ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. कष्टाने पिकवलेले धान्य डोळ्यादेखत मातीत गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, सरकारने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. वादळी वारे आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने राजस्थानसाठी पिवळा इशारा जाहीर केला आहे. आगामी सात आणि आठ एप्रिल रोजी पुन्हा एकदा नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे जोधपूर, उदयपूर, अजमेर आणि जयपूर विभागांत पुन्हा एकदा पाऊस आणि गारपीट होऊ शकते. हवामानातील हा बदल जागतिक हवामान बदलाचा स्पष्ट संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.