ऑस्ट्रेलियात इंधन टंचाईचे भीषण संकट

ऑस्ट्रेलिया सध्या गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण इंधन संकटाचा सामना करत आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलियातील शेकडो पेट्रोल पंप बंद पडले असून, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि क्वीन्सलँड या राज्यांमध्ये परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. सुमारे आठशेहून अधिक सेवा केंद्रांवर किमान एका प्रकारचे इंधन संपले आहे. विशेषतः डिझेलची टंचाई सर्वाधिक जाणवत असून, दर तीस पंपांमागे एक पंप पूर्णपणे बंद आहे. सरकारने जरी इंधनावरील अबकारी करात कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे वाढते दर या कपातीचा परिणाम पुसून टाकत आहेत. सिडनी आणि मेलबर्नमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर भारतीय रुपयांत एकशे पंचवीस रुपयांवर पोहोचले आहेत.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे इंधनाची आयात थांबली आहे. ऑस्ट्रेलियाकडे येणारी सहा तेलवाहू जहाजे रद्द करण्यात आली आहेत . तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे सागरी मार्गांवर असलेल्या धोक्यांमुळे विमा खर्च आणि वाहतूक खर्च वाढला आहे, ज्याचा परिणाम ऑस्ट्रेलियन किमतींवर होत आहे. मार्च २०२६ मध्ये फेडरल सरकारने आपत्कालीन इंधन साठ्याची मर्यादा कमी केली होती. सध्याचा साठा सरासरी उपभोग लक्षात घेता केवळ बत्तीस दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. यामुळे सरकारने आता सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपान यांसारख्या देशांशी संपर्क साधून अतिरिक्त इंधन पुरवठ्याची विनंती केली आहे. डिझेलच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे ऑस्ट्रेलियातील ट्रक चालक आणि वाहतूक कंपन्या संकटात सापडल्या आहेत. जर परिस्थिती सुधारली नाही, तर देशाची वाहतूक व्यवस्था ठप्प होईल, असा इशारा ट्रान्सपोर्ट वर्क युनियनने दिला आहे. याचा थेट परिणाम अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होऊ शकतो, ज्यामुळे देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

इंधन संकटामुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या मानसिकतेत बदल दिसून येत आहे. पेट्रोलच्या किमतींना कंटाळून अनेक नागरिक आता सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत. तसेच, जुन्या डिझेल गाड्यांऐवजी सेकंड-हँड इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अचानक वाढली आहे, ज्यामुळे ईव्हीच्या किमतीतही वाढ झाली आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सरकार इंधन सुरक्षितता वाढवण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढवण्याचा आणि नवीन पुरवठादार शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जोपर्यंत मध्यपूर्वेतील युद्ध थांबत नाही, तोपर्यंत इंधन दर कमी होण्याची चिन्हे धूसर आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
13,369 वेळा पाहिलं