आर्टेमिसकडून आकाशगंगेचे विलोभनीय दर्शन

नासाच्या ऐतिहासिक आर्टेमिस-दोन मोहिमेतील अंतराळवीरांनी अंतराळातून टिपलेले आपल्या आकाशगंगेचे एक विलोभनीय छायाचित्र नुकतेच समोर आले आहे. या छायाचित्राने जगभरातील खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. हे छायाचित्र केवळ सुंदरच नाही, तर विश्वाचे अफाट स्वरूप उलगडणारे एक महत्त्वाचे दस्ताऐवज ठरले आहे.

आर्टेमिस-दोन मोहिमेतील चार अंतराळवीर सध्या पृथ्वीच्या कक्षेबाहेर ओरियन या अंतराळयानातून प्रवास करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी विश्वाच्या त्या भागाचे दर्शन घेतले आहे, जे पृथ्वीवरील वातावरणाच्या अडथळ्यांमुळे आपल्याला कधीच इतके स्पष्ट दिसू शकत नाही. नासाने हे छायाचित्र शेअर करताना म्हटले आहे की, जेव्हा मानवी डोळे पृथ्वीच्या प्रकाशापासून दूर जातात, तेव्हा आकाशगंगेचे खरे तेज उघड होते. या फोटोमध्ये आकाशगंगेचा तेजस्वी पट्टा, कोट्यवधी ताऱ्यांची चमक आणि अंतराळातील तो गडद काळा रंग अत्यंत प्रभावीपणे टिपला गेला आहे.

आर्टेमिस-दोन ही नासाच्या चंद्रावर मानवाला कायमस्वरूपी वस्ती उभारण्याच्या योजनेतील एक निर्णायक पायरी आहे. या मोहिमेत रीड व्हाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन हे चार अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वी ओरियन यानातील जीवनरक्षक यंत्रणा आणि दूरस्थ अंतराळामधील दळणवळण तंत्रज्ञान किती सक्षम आहे, याची ही एक महत्त्वाची चाचणी आहे.  अंतराळवीरांनी घेतलेले हे फोटो केवळ सौंदर्यासाठी नसून त्यांचे वैज्ञानिक मूल्यही विशेष आहे. अंतराळात प्रवास करताना अंतराळवीर ताऱ्यांच्या स्थितीवरून दिशा निश्चित करण्याचे  कौशल्य वापरतात. ही छायाचित्रे त्या प्रशिक्षणाचा आणि निरीक्षणाचा भाग आहेत. अंतराळात हवा किंवा ओझोनचा थर नसल्यामुळे ताऱ्यांचा प्रकाश वक्रीभूत होत नाही. त्यामुळे तेथून टिपलेले फोटो हे रंगांच्या बाबतीत मूळ स्वरूपाच्या सर्वात जवळ असतात. हे अंतराळवीर जसजसे चंद्राच्या जवळ जातील, तसतसे त्यांना चंद्राच्या क्षितिजावरून पृथ्वी उगवतानाचे दृश्य आणि चंद्राच्या त्या भागाचे दर्शन घडणार आहे, जो पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. सध्याच्या या प्रवासात त्यांनी टिपलेले आकाशगंगेचे हे छायाचित्र म्हणजे येणाऱ्या अफाट प्रवासाची एक झलक मानली जात आहे.






14,025 वेळा पाहिलं