
बांगलादेशातील पहिल्या दोन हजार चारशे मेगावॅट क्षमतेच्या रुप्पुर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन भरण्याच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे बांगलादेशने आता जगातील ‘अणुशक्ती गटात आपले स्थान निश्चित केले आहे. रुप्पुर अणुऊर्जा प्रकल्प हा बांगलादेशचा आतापर्यंतचा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रशियाच्या रोसाटॉम या सरकारी अणूऊर्जा कंपनीच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याने उभारला जात आहे. रशियाने या प्रकल्पासाठी केवळ तंत्रज्ञानच दिले नाही, तर युरेनियम इंधनाचा पुरवठा देखील सुरू केला आहे. इंधन भरण्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली.
बांगलादेश सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिक विकासामुळे विजेच्या टंचाईचा सामना करत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर, देशाला दोन हजार चारशे मेगावॅट इतकी प्रचंड वीज अखंडितपणे मिळेल. कोळसा आणि गॅसवर आधारित वीज निर्मिती कमी होईल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल. स्वस्त आणि शाश्वत वीज मिळाल्यामुळे देशातील उद्योगांना मोठी चालना मिळेल आणि निर्यातीत वाढ होईल. अणूऊर्जेचा वापर करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून उभारण्यात आला आहे. रशियन बनावटीची अणुभट्टी येथे वापरण्यात आले आहेत, जे जगातील सर्वात सुरक्षित अणुभट्टयांपैकी एक मानले जातात. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत किंवा तांत्रिक बिघाडात हे अणुभट्टी सुरक्षित राहतील, अशी रचना करण्यात आली आहे.
दक्षिण आशियात भारत आणि पाकिस्ताननंतर आता बांगलादेश हा अणूऊर्जा निर्माण करणारा तिसरा देश ठरला आहे. यामुळे बांगलादेशचा जागतिक स्तरावर दबदबा वाढला आहे. भारताने देखील या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली असून, भारतीय अभियंत्यांनी आणि तज्ञांनी प्रशिक्षण आणि तांत्रिक सल्ल्यामध्ये सहकार्य केले आहे.