
नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर गावात गेल्यावर हरगड दिसतो. मुल्हेर गावातून तीन किल्ले दिसतात. समोर मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडे हरगड किल्ला दिसतो. हरगडाचा माथा प्रशस्त आहे. गडावर प्रवेश करताना लागणाऱ्या सगळ्या दरवाजांची आता पडझड झालेली आहे. दरवाजा असल्याच्या खुणा तेवढ्या तेथे अस्विाावा त आहेत. शेवटच्या दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरासमोर चार दगडी तोफगोळे पडलेले आहेत. या किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.
मंदिरासमोरुन डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाके लागते. तेथे घरांचे व वाड्याचे अवशेष दिसतात. पाण्याच्या टाकीखालून जाणाऱ्या वाटेने खाली उतरल्यावर एक तळे दिसते. या तळ्याच्या मागील बाजूला एक गुप्त दरवाजा आहे. उजवीकडच्या वाटेने गेल्यावर एक १४ फ़ूट लांबीची तोफ़ पडलेली दिसते. या गडावरुन मुल्हेर गडाची माची, मोरागड, न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर असा सगळा परिसर दिसतो. हा गडमाथा फ़िरण्यास २ तास पुरेसे आहेत.
हरगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असून त्या मुल्हेरवाडी गावातूनच जातात. मुल्हेरवाडीमध्ये पोहोचण्यासाठी नाशिकमार्गे ९५ किमी वरील सटाणा गाव गाठावे लागते. सटाण्याहून २५ किमी.वर असलेल्या ताहाराबादला जावे लागते. ताहाराबाद गावातून मुल्हेरवाडीला जाण्यासाठी एसटी किंवा जीप मिळतात. गावात गेल्यावर गड चढण्यासाठी असणाऱ्या वाटा समजतात. गावातून हरगडावर जाण्यास ३ तास लागतात. या किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.