घटस्फोट घेताय मुलांनाही समजून घ्या

अलीकडे पती-पत्नीमधील घटस्फोटाची प्रकरणे सध्या सामान्य झाली आहेत. विभक्त होण्याचा वाईट परिणाम केवळ जोडप्यांवरच होत नाही, तर मुलांवरही होतो. अशा प्रसंगी आई-वडिलांनी मुलांनाही त्यांच्या भावनांशी समरस होऊन हाताळण्याची गरज आहे; अन्यथा ते तणाव व नैराश्याचे बळी ठरू शकतात. त्यांच्या भावना समजून घ्या. मुले समजूतदार असतील तर घटस्फोटाचा जास्त विचार करू लागतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यात अनेक बदल दिसून येतात. अशा वेळी त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांना सध्या कसे वाटत असेल, याची कल्पना करुन बघा. यामुळे त्यांना समजावणे सोपे जाईल.

घटस्फोटानंतर एकल पालकांवरही बऱ्याच जबाबदाऱ्या येतात. त्यांचे व्यवस्थापन करणे खूप कठीण होऊन जाते. अशा वेळी पालकांना संयमाने घ्यावे लागेल. मुलांसोबत पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेळ घालवावा लागेल; जेणेकरून त्याचा मुलावर वाईट परिणाम होणार नाही. मुलांशी आपले नाते खेळीमेळीचे, विश्वासाचे, आपुलकीचे ठेवण्यासाठी मुलांसोबत वेगवेगळ्या उपक्रमात भाग घ्या. यामुळे मुले व्यस्त राहतील. ती जास्त विचार करणार नाहीत. असे केल्याने तुम्ही मुलांना मोठ्या प्रमाणात आधार देऊ शकता. त्यांच्यावर कोणताही निर्णय लादू नका.

घटस्फोटानंतर जर मूल एका पालकाची खूप आठवण काढत असेल, परंतु आपण त्या व्यक्तीवर रागावत असाल, किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संभाषण करण्याची इच्छा नसेल तर हा निर्णय तुमचा आहे, तो मुलांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. सर्वप्रथम, आपल्या घटस्फोटामुळे मूल दुःखी आहे. तुमची ही जबरदस्ती त्याला अधिक त्रास देऊ शकते, हे लक्षात ठेवा. जर मुलाला पालकांपैकी एकासह थोडा वेळ घालवायचा असेल तर त्याला मनाई करू नका. मुलाला हाताळण्याचा हा योग्य मार्ग आहे. घटस्फोटानंतर दांपत्य मोकळी होऊ शकतात, अधिक आनंदी राहू शकतात, आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकतात; परंतु जर तुम्ही पालक असाल तर घटस्फोटानंतर मुलांच्या मानसिक स्थितीचाही विचार आपण करायला हवा. त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देऊ नये.







12,747