
गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध आणि जागृत क्षेत्र आहे. हे समुद्रकिनाऱ्यावरील श्री गणेश मंदिर पर्यटकांमध्ये सुपरिचित आहे. रत्नागिरी शहरापासून हे २५ किलोमीटर व मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर हे क्षेत्र आहे. गणपतीपुळ्याचे हे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीनस्थान आहे. येथे पूर्वी केवड्याचे वन होते. त्याठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. संकटाचे निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन, असा निश्चय करुन त्यांनी मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात मुक्काम केला. त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. एके दिवशी भिडेंना दृष्टांत झाला की, मी याठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजा कर, तुझे संकट दूर होईल.
त्याच कालखंडात खोत भिडे यांच्या गाईने दूध देणे बंद केले. गुराख्याने तिच्यावर बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली. त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर करुन त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली. हे मंदिर समुद्रकिनाऱ्याकडे दिसणाऱ्या एका छोट्या टेकडीवर आहे. ते भारतातील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गसौंदर्याव्यतिरिक्त, गणपतीपुळे हे ‘पॅराग्लायडिंग’, ‘कयाकिंग’ आणि ‘स्नॉर्कलिंग’ यांसारख्या विविध साहसी खेळांसाठी देखील प्रसिद्ध आहे. पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर लांब फिरण्यासाठी देखील जाऊ शकतात; किंवा आराम करू शकतात. शहरातील जीवनाच्या गजबजाटापासून दूर, शांततापूर्ण आणि आरामदायी समुद्रकिनारा शोधणाऱ्यांसाठी गणपतीपुळे हे एक योग्य ठिकाण आहे.
गणपतीपुळे येथील मूर्ती स्वयंभू आहे, अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात ही नैसर्गिक मूर्ती विराजमान आहे. जवळच पश्चिमेला समुद्र असल्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि झाडांमुळे अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. हा भारताच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरीत असलेला एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. शांत परिसर, पांढरे वाळूचे किनारे आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी हा ओळखला जातो. हा समुद्रकिनारा हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला आहे. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे.