रावणपूजक गाव

काही धार्मिक स्थळे अचंबित करणारी असतात. ती पाहण्यासाठी प्रत्येकाला आवर्जुन जावेसे वाटते. असेच एक स्थळ आहे. भारतातील एका राज्यात रामाची नाही, तर रावणाची पूजा केली जाते. ऐकताच वाटते की, हे राज्य दाक्षिणात्य असावे; परंतु तसे नसून ही पूजा आपल्या महाराष्ट्रातील गावात केली जाते. हे आश्चर्यजनक असले तरीही सत्य आहे. अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात हे ठिकाण आहे. या गावात रावणाची पूजा आणि आरती होते. सांगोळा गाव हे अकोल्यापासून 50 किलोमीटरवर असलेल्या पातूर तालुक्यात आहे. गावात प्रवेश करतानाच हे ठिकाण मिळते. येथे चौथऱ्यचा आकार दिलेल्या पारावर एक काळे पाषाण आहे. त्यावर रावणाची रेखीव मूर्ती कोरली आहे. दहा डोकी असलेल्या या मूर्तीला सुमारे साडे तीनशे वर्षांची परंपरा असल्याचे येथील नागरिक सांगतात.

या गावात रावणाच्या मंदिरासोबत इतर देवदेवतांचीही मंदिरे आहेत. या देवतांच्या पूजनाबरोबरच गावकरी रावणाचीही आराधना करतात; मात्र रावणाच्या पुजेविषयी मोठे कुतूहल असल्याने अनेक लोक ही मूर्ती पाहण्यासाठी येतात. दसऱ्यादिवशी सांगोळा गावात भाविकांची मोठी गर्दी असते. रावणाची आराधना केली जाते. दसऱ्याला होणारे रावण दहन थांबवावे, असे आवाहनही हे गावकरी लोकांना करतात. दसरा आणि रामनवमीला गावकरी विशेष सोहळा साजरा करतात. आरती करतात. असे सांगितले जाते की, काही बाहेरच्या लोकांकडून एकदा ही मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही मूर्ती त्यांना उचलता आली नसल्याचे गावकरी सांगतात. केवळ चौथऱ्यावर असणाऱ्या या रावण मंदिराच्या उभारणीसाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत.

आमदार निधीतून आमदार अमोल मिटकरी यांनी या मंदिराला सभागृह बांधकामासाठी 20 लाखांचा निधी दिला असून या कामाचे त्यांनी नुकतेच भूमिपूजन केले आहे. आता येथे रावणाचे मंदिर उभे होणार आहे. ग्रामस्थ सांगतात की, रावणात दुर्गुणांसोबतच सद्गुणही होते. मात्र, त्याच्या सद्गुणांकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा विचार करुन ही पूजा केली जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ही अनोखी परंपरा पहण्यासाठी मुद्दामहून येथे पर्यटक भेट देण्यासाठी जात असतात. शेकडो वर्षांची परंपरा आजही येथे पाळली जाते. यामागील आख्यायिका निश्चित माहित होत नसली तरीही ही परंपरा लक्ष वेधून घेते. दसरा, रामनवमीला येथे भाविकांची गर्दी असते. ग्रामस्थ उत्साहाने येथील सण साजरे करतात.







12,392