कमळगड किल्ला

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कमळगड किल्ला आहे. शिवराज्याभिषेकाच्या आधी कमळगड स्वराज्यात सामील झाला. या गडाचे दुसरे नाव ‘भेळंजा’ असे आहे. एप्रिल १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने असलेल्या डोंगररांगेवर हा किल्ला आहे. सर्वसाधारण किल्ल्यांवर असणारे तट-बुरूज असे कोणते अवशेष या किल्ल्यावर नाहीत. निसर्गाची अमाप लयलूट मात्र या कमळगडास लाभली आहे.

कमळगडास भेट देण्यासाठी प्रथम वाई गाव गाठावे लागते. वाईहून ‘वासोळे’ गावाला जाणारी एस.टी. पकडावी लागते. वासोळे गावातून पायी अर्ध्या तासात तुपेवाडीत जावे लागते. तुपेवाडी पार करुन गडाच्या उजव्या खिंडीच्या वाटेने जावे लागते. पुढची पायवाट चालून तासाभरात खिंडीच्या वरच्या भागात जाऊन पोहोचता.

पुढे गेल्यावर गोरखनाथाचे मंदिर मिळते. येथे एक बारमाही वाहणारा झरा आहे. येथेच पाण्याची सोय असून गडावर पाणी मिळत नाही. कमळगडावरील ‘गेरुची’ विहीर आश्चर्यकारक आहे. ही विहीर जमीन खोल चिरत गेलेल्या एका रूंद भुयारासारखी आहे. विहीरीच्या पायऱ्यांच्या वाटेने खाली जाता येते. जेवढी खोल जावू तसा हवेतील गारवा वाढत जातो.

किल्ल्याच्या मध्यभागी वर गवत वाढलेले चौथऱ्याचे अवशेष दिसतात. गडावर कोठेही पाण्याचे तळे नाही. किल्ल्यावरून महाबळेश्वरचा वनाच्छादित परिसर, रायरेश्वरचे पठार, केंजळगड , धोम धरणाचा जलाशय असा सुंदर प्रदेश दिसतो. गडावरून परतण्यास वेळ झाल्यास मुक्कामासाठी तुपेवाडीत विठ्ठल मंदिर आहे.






156 वेळा पाहिलं