
गाझा पट्टीतील नागरिकांच्या अडचणींत आता निसर्गाच्या कोपाने आणखी भर घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण वादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे विस्थापितांच्या छावण्यांमधील जवळजवळ सर्वच तंबू उद्ध्वस्त झाले आहेत. आधीच उपासमार आणि युद्धाचा सामना करणाऱ्या लाखो पॅलेस्टिनी नागरिकांवर आता उघड्या माळावर कडाक्याच्या थंडीत राहण्याची वेळ आली आहे.
गाझाच्या मध्य आणि दक्षिण भागात, विशेषतः अल-मवासी आणि खान युनिस या भागांत विस्थापितांचे मोठे तळ आहेत. समुद्रावरून आलेल्या वेगवान वाऱ्यांनी आणि पावसाने या छावण्यांची दयनीय अवस्था केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, बहुतांश तंबू हे निकृष्ट दर्जाचे प्लास्टिक आणि कापडाचे बनलेले होते, जे ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करू शकले नाहीत. पावसामुळे अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले असून, संपूर्ण छावण्यांचे रूपांतर चिखलाच्या दलदलीत झाले आहे. लोकांचे कपडे, अंथरूण आणि उरलेसुरले धान्यही भिजून खराब झाले आहे.
रात्रभर आम्ही आमच्या मुलांच्या अंगावर प्लास्टिक धरून उभे होतो, जेणेकरून ते भिजणार नाहीत. पण वाऱ्याचा जोर इतका होता की आमचा तंबू फाटून हवेत उडाला, असे एका विस्थापित महिलेने रडत सांगितले. गाझामधील थंडीचा कडाका वाढल्याने लहान मुले आणि वृद्धांमध्ये न्यूमोनिया आणि हायपोथर्मियाचा धोका वाढला आहे. अनेक कुटुंवे आता ओल्या जमिनीवर किंवा उघड्यावर प्लास्टिकचे तुकडे सांधून आसरा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे त्यांना आग पेटवून स्वतःला उबदार ठेवणेही अशक्य झाले आहे. मानवतावादी संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये सध्या नवीन तंबूंची प्रचंड कमतरता आहे. इस्रायलकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आणि सीमा ओलांडून येणाऱ्या ट्रकच्या अत्यल्प संख्येमुळे ताडपत्री, लाकडी खांब आणि ब्लँकेटचा पुरवठा थांबला आहे. छावण्यांमध्ये पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने दूषित पाणी आणि सांडपाणी साचले आहे. यामुळे कॉलरा आणि इतर जलजन्य आजार पसरण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाणी उपसण्यासाठी लागणाऱ्या पंपांसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने साचलेले पाणी काढणे कठीण झाले आहे.
युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, तातडीने युद्धविराम आणि मानवतावादी मदतीचा ओघ वाढवण्याची मागणी केली आहे. हे केवळ युद्ध नाही, तर निसर्गाशी सुरू असलेली एक जीवघेणी लढाई आहे, असे विधान एका मदत कार्यकत्याने केले. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे आधीच नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या विस्थापित झाली आहे. आता या वादळाने त्यांच्याकडे असलेला शेवटचा आसराही हिरावून घेतला आहे.