अमेरिकेत अंतर्गत विमान प्रवासासाठी प्रमाणित ओळखपत्र नसल्यास दंड

अमेरिकेतील विमान प्रवासाच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. एक फेब्रुवारीपासून प्रमाणित ओळखपत्र नसलेल्या प्रवाशांना आता पंचेचाळीस डॉलर्स म्हणजे सुमारे तीन हजार आठशे रुपये इतके शुल्क मोजावे लागणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे विना-आयडी प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

आतापर्यंत अमेरिकेत अंतर्गत विमान प्रवासासाठी रिअल आयडी नसेल तरीही काही अतिरिक्त तपासणीनंतर प्रवाशांना सोडले जात होते. मात्र, नवीन नियमानुसार आता प्रवाशांना या पर्यायी पडताळणी प्रणालीचा वापर करावा लागेल. ज्या प्रवाशांकडे रिअल आयडी सुसंगत ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट नसेल, त्यांना आपली ओळख पटवण्यासाठी पंचेचाळीस डॉलर्स भरावे लागतील. हे शुल्क भरल्यानंतर मिळालेली पोचपावती केवळ दहा दिवसांसाठी वैध असेल. जर तुमचा प्रवास दहा दिवसांपेक्षा जास्त असेल, तर परतीच्या प्रवासासाठी तुम्हाला पुन्हा पंचेचाळीस डॉलर्स भरावे लागतील. या पडताळणी प्रक्रियेसाठी तीस मिनिटांहून अधिक वेळ लागू शकतो, ज्यामुळे प्रवाशांची फ्लाईट चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमाणित ओळखपत्र हा अमेरिकेतील राज्यांनी जाहीर केलेला एक असा ओळख पुरावा आहे, जो केंद्र सरकारच्या सुरक्षा मानकांनुसार तयार केला जातो. २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने हवाई प्रवासाची सुरक्षा वाढवण्यासाठी रिअल आयडी ॲक्ट संमत केला होता, ज्याची पूर्ण अंमलबजावणी आता केली जात आहे. प्रमाणित ओळखपत्र नसल्यास ड्रायव्हिंग लायसन्स, अमेरिकन पासपोर्ट किंवा पासपोर्ट कार्ड, ग्लोबल एन्ट्री किंवा नेक्सस कार्ड, अमेरिकन लष्करी ओळखपत्र, कायमस्वरूपी रहिवासी कार्ड असणे गरजेचे आहे. ज्या प्रवाशांकडे रिअल आयडी नाही, त्यांच्या ओळख पडताळणीसाठी येणारा जास्तीचा खर्च आता करदात्यांवर न पडता थेट संबंधित प्रवाशाकडून वसूल केला जाईल. हा नियम अठरा वर्षांवरील सर्व प्रवाशांना लागू असेल, मात्र, अठरा वर्षांखालील मुलांना पालकांसोबत प्रवास करताना ओळखपत्राची गरज भासणार नाही. अनेक प्रवाशांनी या शुल्कावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः ज्या कुटुंबांकडे अद्याप अपडेटेड आयडी नाहीत, त्यांच्यासाठी हा आर्थिक भुर्दंड ठरणार आहे. अमेरिकेतील सुमारे चौऱ्याण्णव टक्के नागरिकांकडे आधीच रिअल आयडी असल्याचे सांगण्यात येत असले तरी, उर्वरित अठरा दशलक्ष प्रवाशांना या नवीन नियमाचा फटका बसण्याची शक्यता आहे.






3,014 वेळा पाहिलं