एसटी बसस्थानकांवर दर पंधरा दिवसांनी राबवली जाणार स्वच्छता मोहीम
महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अस्वच्छ फलाट, दुर्गंधीयुक्त प्रसाधनगृहे आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे एसटीची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत परिवहन विभागाने आता कंबर कसली असून, राज्यातील सर्व बसस्थानकांवर दर पंधरा दिवसांनी म्हणजेच महिन्यातून दोनदा स्वच्छता मोहीम राबवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्र्यांनी सोलापूर येथील बसस्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी तेथील भीषण अस्वच्छता पाहून त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. राज्यातील इतरही अनेक बसस्थानकांची परिस्थिती सोलापूरसारखीच असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केवळ एकदाच स्वच्छता न करता, त्यात सातत्य राखण्यासाठी दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत. ही मोहीम केवळ एसटी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता, ती एक लोकचळवळ बनवण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकांचे स्वच्छता कर्मचारी, स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि स्थानिक प्रवासी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग सहभाग असणार आहे.
या मोहिमेअंतर्गत केवळ वरवरची साफसफाई न करता, बसस्थानकाचा कानाकोपरा स्वच्छ केला जाणार आहे. यात प्रामुख्याने बसस्थानकातील बैठक व्यवस्था, लादी, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे आणि फलाट, महिला विश्रांतीगृहे आणि शौचालयांची विशेष निर्जंतुकीकरण करून सफाई, कार्यालयीन कक्ष आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची स्वच्छता, बस उभी राहण्याची जागा आणि स्थानकाचा बाह्य परिसर साफ केला जाईल. बसस्थानकांच्या भिंतींवर अनधिकृतपणे लावलेले पोस्टर्स आणि फाटलेले बॅनर्स यामुळे स्थानकाचे विद्रुपीकरण होते. नव्या निर्देशानुसार, आता बसस्थानक परिसरातील बॅनरची गर्दी हटवण्यात येणार आहे. भिंतींवरील जाहिराती काढून त्या रंगवून चकचकीत करण्यावर महामंडळाचा भर असेल. यामुळे प्रवाशांना एक प्रसन्न आणि स्वच्छ वातावरण अनुभवायला मिळेल.
या मोहिमेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. जर एखाद्या स्थानकात स्वच्छतेत कुचराई आढळली, तर विभागप्रमुखांना जबाबदार धरले जाईल. तसेच, केवळ कचरा गोळा न करता त्याचे वर्गीकरण ओला आणि सुका कचरा करून शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र कचरा कुंड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. एसटी हे ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचे केंद्र आहे. रोज लाखो प्रवासी येथून प्रवास करतात. या स्वच्छता मोहिमेमुळे बसस्थानके अधिक आरोग्यदायी आणि आनंददायी होतील. यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होईल आणि स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र या अभियानाला बळ मिळेल.