परभणीत बनावट सहकारी संस्थांवर कारवाई

जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या अनेक खोट्या सहकारी संस्थांचा पर्दाफाश झाला असून, अशा ३७ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ही बाब थेट विधीमंडळात उपस्थित केल्यानंतर प्रशासनाला हालचाल करावी लागली.
शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी केंद्र शासनामार्फत विविध योजनांअंतर्गत रक्कम वितरीत केली जाते. ही रक्कम सहकारी संस्थांच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते. मात्र परभणी जिल्ह्यात काही खाजगी व्यक्तींनी बनावट कागदपत्रांद्वारे खोट्या सहकारी संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थांच्या नावावर शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत लाखो रुपयांचे अनुदान उचलले.
ही फसवणूक लक्षात येताच आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ही बाब विधीमंडळात जोरकसपणे मांडली. त्यांच्या मागणीनुसार सरकारने याची चौकशी केली असता ३७ खोट्या संस्था निष्पन्न झाल्या असून, या संस्थांची नोंदणी तत्काळ रद्द करण्यात आली आहे. यामध्ये काही संस्थांचे पत्ते अस्तित्वात नसल्याचेही निष्पन्न झाले आहे.
शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी अशा बनावट संस्थांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार गुट्टे यांनी केली असून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.