
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने फास्टॅग वापरण्याच्या नियमात मोठा बदल करत नवा निर्णय घेतला आहे. आता फास्टॅग वाहनाच्या समोरील काचेवर नीट व ठरावीक जागी न चिकटवता जर सैलपणे ठेवण्यात आला, तर अशा चालकांना थेट ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे.
सध्या काही चालक फास्टॅग डॅशबोर्डवर ठेवतात किंवा हातात धरून टोलनाक्यावरून जातात. यामुळे कॅमेऱ्यांना स्कॅन करता येत नाही, टोल भरण्यात विलंब होतो, आणि एकाच फास्टॅगचा वापर अनेक वाहनांमध्ये केला जातो, हे प्रकार समोर येत आहेत.
11 जुलै २०२५ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, सर्व टोल प्लाझांना अशा चुकीच्या पद्धतीने फास्टॅग वापरणाऱ्या वाहनांची माहिती संकलित करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती मिळताच संबंधित फास्टॅग ब्लॅकलिस्ट केला जाईल आणि त्याचा वापर थांबवण्यात येईल.
एकदा फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाल्यावर वाहनचालकाला नवीन फास्टॅगसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. यामुळे वेळ आणि खर्च वाढेल. याशिवाय, भविष्यात येणाऱ्या मल्टि-लेन फ्री फ्लो सारख्या डिजिटल टोल प्रणालीत अशा चुकीच्या सवयी अडथळा ठरू शकतात.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वाहनचालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, फास्टॅग नेहमी समोरील काचेला व्यवस्थित चिकटवावा, तो सैलपणे किंवा हलत्या अवस्थेत ठेवू नये. अन्यथा त्याचा वापर अयोग्य मानला जाईल आणि त्यासाठी गंभीर परिणाम भोगावे लागतील.