राज्यात बिबट्यांची संख्या वाढल्याने नियंत्रणासाठी आफ्रिका मोहिमेचा प्रस्ताव
पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढत असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी बिबटे थेट मानवी वस्तीपर्यंत पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी महत्त्वाचे विधान करत सांगितले की, राज्यातील बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांच्या आक्रमक हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी काही बिबटे आफ्रिकेत पाठविण्याचा विचार सरकार करत आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत आतापर्यंत बाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पिंपरखेड गावातील पाच वर्षांचा शिवन्या बोंबे आणि तेविस वर्षांचा रोहन बोंबे या दोन मुलांचा तसेच जांबूत गावातील भागूबाई जाधव या महिलांचा समावेश आहे. सलग हल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत आणि अनेकांनी रात्री बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
वनमंत्री नाईक यांनी सांगितले की, “जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर बिबटे गावागावात कुत्र्यांसारखे भटकताना दिसतील.” त्यामुळे वन विभागाने आता व्यापक मोहीम हाती घेतली आहे. बिबटे पकडण्यासाठी राज्यभरात एक हजार दोनशे पिंजरे देण्याचा निर्णय झाला असून त्यापैकी सध्या दोनशे पिंजरे पुणे जिल्ह्यात पोहोचवण्यात आले आहेत.
बिबटे पकडल्यावर त्यांना जंगलात परत सोडण्याऐवजी योग्य पुनर्वसनासाठी उपाय शोधले जात आहेत. गुजरातमधील ‘वनतारा’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले आहे. या संस्थेमार्फत बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदीची प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच काही बिबटे आफ्रिकेत पाठविण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
वनमंत्री म्हणाले की, “आफ्रिकेत सिंह आणि वाघ आहेत, पण तिथे बिबटे नाहीत. तिथल्या पर्यावरणात त्यांना वावरता येईल, म्हणून काही बिबटे तेथे पाठवण्याची कल्पना आहे.” दुसरीकडे, जे बिबटे नरभक्षक बनले आहेत त्यांच्यावर दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेशही वन विभागाला देण्यात आले आहेत. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना तातडीची मदत आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस वन विभागात नोकरी देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, अशी आशा वन खात्याने व्यक्त केली आहे.