
इराणमधील वाढता अंतर्गत संघर्ष लक्षात घेता, एअर इंडियाने इराणच्या हवाई क्षेत्राचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. एअर इंडियाने आपली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता इराकच्या हवाई मार्गावरून वळवली आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला असला तरी, प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणमध्ये सध्या आर्थिक संकट आणि राजकीय कारणांमुळे देशव्यापी निदर्शने सुरू आहेत. तसेच इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावही टोकाला पोहोचला आहे. प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून, जोखीम टाळण्यासाठी आम्ही पर्यायी मार्गांचा अवलंब करत आहोत, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांवर परिणाम झाला आहे. दिल्ली आणि मुंबईहून न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस यांसारख्या शहरांकडे जाणारी विमाने आता इराणचा मार्ग टाळून इराक किंवा इतर सुरक्षित मार्गांनी जात आहेत. नवीन मार्गामुळे प्रवासाचा वेळ साधारणपणे तीन ते पंचेचाळीस मिनिटांनी वाढला आहे. काही लांब पल्ल्याच्या उड्डाणांना तर अतिरिक्त इंधन भरण्यासाठी तांत्रिक थांबा घ्यावा लागू शकतो. जिथे पर्यायी मार्ग उपलब्ध करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते, अशा काही मोजक्या फेऱ्या एअर इंडियाने रद्द केल्या आहेत. यामध्ये दिल्ली – न्यूयार्क आणि मुंबई – न्यूयार्क यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. एअर इंडियासोबतच इंडिगो या कंपनीनेही मोठा निर्णय घेतला आहे. इंडिगोने तिबिलिसी, अल्माटी, ताश्कंद आणि बाकू यांसारख्या शहरांसाठीची आपली उड्डाणे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत रद्द केली आहेत. इंडिगोची ए तीनशे वीस निओ विमाने इराणचा लांबचा वळसा घेऊन जाण्यासाठी पुरेशा इंधन क्षमतेची नसल्याने, कंपनीने थेट उड्डाणे रद्द करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचे स्टेटस अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल ॲपवर तपासण्याचे आवाहन केले आहे. अनपेक्षित रद्द झालेल्या फ्लाईट्ससाठी प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा पर्यायी विमानाचे तिकीट देण्याची सोयही करण्यात आली आहे. भारतीयच नव्हे, तर लुफ्थान्सा आणि इतर युरोपियन विमान कंपन्यांनीही इराणच्या हवाई क्षेत्रापासून लांब राहणे पसंत केले आहे. इराणमधील यादवी युद्धसदृश परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय तणाव जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत हवाई मार्गांमधील हा बदल कायम राहण्याची शक्यता आहे.