एअर इंडियाचा सर्व्हर ठप्प झाल्याने विमान प्रवाशांची गैरसोय

देशातील प्रमुख विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीत सापडली आहे. आज दुपारी अचानक कंपनीचा सर्व्हर बंद पडल्याने देशभरातील विमानतळांवर उड्डाणांना मोठा विलंब झाला. विशेषतः दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली.

सर्व्हर डाऊन झाल्याने चेक-इन, बोर्डिंग पास, सामान जमा करण्याची प्रक्रिया आणि फ्लाइट माहिती प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांना रांगेत तासन्‌तास थांबावे लागले. कर्मचारी हाताने काम करत होते परंतु त्यामुळे प्रक्रिया मंदावली आणि नाराज प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही प्रवाशांनी समाज माध्यमांवर आपल्या अडचणी मांडत “एअर इंडियाच्या सर्व्हरमुळे माझी कनेक्टिंग फ्लाइट सुटली” अशी तक्रार केली. या गोंधळामुळे अनेक प्रवाशांचे प्रवास नियोजन बिघडले असून अनेक उड्डाणे उशिरा निघाल्याचे आणि काही रद्द झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘ही तात्पुरती तांत्रिक अडचण असून ती दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच सर्व्हर पूर्ववत सुरू होईल आणि उड्डाण सेवा सुरळीत होईल’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान तांत्रिक प्रणालीवर संपूर्णपणे अवलंबून असलेल्या विमान कंपन्यांसाठी अशा घटना प्रवाशांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या ठरत आहेत. प्रवाशांनी तातडीने माहिती आणि मदतीची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रवाशांची कंपनीकडून अधिक प्रभावी डिजिटल प्रणालीची मागणी होत आहे.






16,230 वेळा पाहिलं