
पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये जलसाठा झपाट्याने वाढत आहे. परिणामी, धरण प्रशासनाने धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भीमा नदीच्या काठावर असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून सध्या एकूण एकवीस हजार सहाशे सेक्स इतका मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामध्ये वीस हजार क्यूसेक्स पाणी नदीपात्रामार्गे सोडले जात असून उर्वरित एक हजार सहाशे क्यूसेक्स पाणी विजनिर्मितीसाठी वळविण्यात आले आहे. उजनी धरणाची एकूण साठवणूक क्षमता एकशे सतरा टीएमसी असून सध्या ते जवळपास चौऱ्याण्णव टक्के भरले आहे.
दौंड परिसरातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाहही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या दौंड भागातून उजनीकडे सुमारे अकरा हजार एकशे सत्तर क्यूसेक्स पाणी येत आहे. त्यामुळे उजनी धरणाचे पाणी व्यवस्थापन सुयोग्य ठेवण्यासाठी विसर्गात वाढ करण्यात आली आहे.
या वाढीव विसर्गामुळे भीमा नदीच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही उतरणे किंवा पाण्यात कोणत्याही प्रकारची हालचाल करणे धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांतील मोटारपंप, पाइप, वीजकेबली इत्यादी साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक यंत्रणांना सद्यस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.