
‘ऑल हर फॉल्ट’ ही एक उत्कंठावर्धक रहस्यमय आणि थरारक हॉलीवूड वेबमालिका आहे जी दिनांक नोव्हेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्स या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. आयर्लंड आणि अमेरिकेच्या संयुक्त निर्मितीतील ही मालिका आहे मात्र तिचं सादरीकरण आणि दृश्यरचना पूर्णपणे हॉलीवूडच्या दर्जाला साजेशी आहे.
ही मालिका प्रसिद्ध लेखिका अॅडेल पार्क्स यांच्या “ऑल हर फॉल्ट” या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. कथानकात एका सामान्य आईच्या आयुष्याला अचानक धक्का बसतो जेव्हा ती आपल्या मुलाला एका मैत्रिणीच्या घरी खेळायला सोडण्यासाठी जाते आणि तिथे पोहोचल्यावर तिला समजतं की त्या घरातली अनोळखी व्यक्ती ती अजिबात ओळखत नाही. आणि तिचा मुलगाही तिला कुठेच दिसत नाही. हा क्षण तिच्या आयुष्याला भयानक कलाटणी देतो. त्या क्षणापासून पुढे सुरू होतो तिचा शोध, संशय, गोंधळ आणि मातृत्वाच्या भीतीचा ताणतणावाने भरलेला प्रवास.
या मालिकेचं दिग्दर्शन अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक भागात कथानकात नवे रहस्य उलगडत जातं आणि प्रेक्षकांची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत राहते. मालिकेचा प्रत्येक दृश्य ताण आणि थरार निर्माण करणारा आहे. पार्श्वसंगीत, शांततेचा वापर आणि नायिकेच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव हे सगळं एकत्र येऊन एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव तयार करतात.
मुख्य भूमिकेत सारा स्नूक ही प्रतिभावान अभिनेत्री दिसते. तिने साकारलेली आई अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी वाटते. तिच्या अभिनयात भय, असहायता आणि मुलासाठीची तगमग या सगळ्याच भावना प्रभावीपणे दिसतात. तिच्यासोबत डकोटा फॅनिंग आणि जेक लेसी यांच्याही भूमिका या मालिकेत अद्भुत आहेत. विशेषतः प्रत्येक कलाकाराने आपला स्वभाव, हावभाव आणि संवाद इतक्या प्रभावीपणे मांडले आहेत की कथानकाचा वेग कमी होत नाही.
‘ऑल हर फॉल्ट’ ही फक्त एक रहस्यकथा नाही तर ती एक आईच्या प्रेमाची आणि तिच्या संघर्षाची कहाणी आहे. ती दाखवते की भीती कितीही मोठी असो पण जेव्हा विषय आपल्या लेकराचा असतो तेव्हा एक साधी स्त्रीही मोठमोठ्या संकटांना सामोरे जाऊन हरवून टाकते.दिग्दर्शकाने या मालिकेत केवळ थरार दाखवला नाही तर समाजातील भावनिक ताण, विश्वासघात आणि “आपल्या ओळखींची खरी किंमत काय” या प्रश्नांनाही हात घातला आहे. कथानकात अनेक वळणं आहेत.ज्यामुळे प्रेक्षक शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज लावू शकत नाहीत.
‘ऑल हर फॉल्ट’ ही एक अशी वेबमालिका आहे जिचं प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक क्षण मनात घर करून राहतो. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली ही हॉलीवूड निर्मिती रहस्य, भावना आणि मातृत्व यांचा एक प्रभावी संगम आहे. ही वेबमालिका शेवटी विचार करायला लावते की “कधी कधी दोष कोणाचाच नसतो पण नकळत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात.” प्रत्येक भागात उत्सुकता निर्माण करणारी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असल्याने प्रेक्षक आणि समीक्षकांनी या वेब मालिकेला पाच पैकी चार गुण दिले आहेत.