अंबागड किल्ला

महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील ‘तुमसर’ तालुक्यात ‘अंबागड’ हा एक सुंदर किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम, त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने संवर्धन केल्यामुळे हा किल्ला उत्तम अवस्थेत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होवू शकेल. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. हनुमान मंदिरापासून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

गोंड राजा बख्त बुलंद याचा सरदार राजखान पठाण याने हा किल्ला इसवी सन १७०० च्या सुमारास हा किल्ला उभारला. पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेल्यावर त्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. पायऱ्यावरुन साधारणपणे आपण अर्ध्या तासात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पिंपळपान आणि कमलपुष्प कोरलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच देवड्यामधून बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. बुरुजावरून किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि किल्ल्याच्या आतील भागावर नजर ठेवता येते. बुरुज पाहून खाली उतरून पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर दिसते.

त्यात शेंदूर लावलेला एक दगड आहे. हे मंदिर अलीकडच्या काळात बांधलेले असावे, असे वाटते. या मंदिराजवळ चुन्याच्या घाण्याचे तुटलेले चाक पडलेले आहे. देवड्यांकडून किल्ल्यात जाणाऱ्या पायवाटेने पुढे जाताना डाव्या बाजूला एक विहीर आह. उजव्या बाजूला बांधीव तलाव आहे. त्यावर एक पडकी वास्तू आह. पुढे चालून गेल्यावर काही बुरुज लागतात. थोड्या पायऱ्या चढल्यावर चौथा बुरुज लागतो. या बुरुजाच्या उजव्या बाजूला मोठा आयताकृती बांधीव तलाव आहे . या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या तलावाच्या बाजूला वास्तूचे प्रवेशद्वार आहे. ही एक जीर्ण वास्तू आहे. डाव्या कोपऱ्यात आणखी एक इमारत आहे.

या इमारतीला एकही खिडकी नाही. इमारतीच्या रचनेवरून येथे दारु कोठार असावे, असे वाटते. दारु कोठार पाहून उजव्या बाजूला गेल्यावर एक चौकोनी बांधीव विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बाजूलाच किल्ल्याची प्रवेशद्वारापासून आलेली तटबंदी आहे. किल्ल्याचा हा भाग पाहून पुन्हा माघारी परतावे.

बालेकिल्ल्यातील चारही बुरुज चौकोनी आहेत. किल्ल्याच्या टोकाला असलेल्या चौकोनी बुरुजात एक खोली आहे. या खोलीतून बुरुजाच्या बाहेर पडता येते. या किल्ल्यात एक महाल आहे. या महालातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नक्षीकाम केलेले कोनाडे असलेली एक भिंत आहे. ही भिंत संपते तेथे एक चौकोनी बुरुज आहे. या बुरुजात चोर दरवाजा आहे. बुरुजात असलेल्या पायऱ्यांवरुन खाली उतरल्यावर आपण किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला येता. येथून किल्ल्याखाली जाणारी वाट आहे. याठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.






10,616 वेळा पाहिलं