विकसित महाराष्ट्र सर्वेक्षणात भाग घेण्याचे आवाहन

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ ही संकल्पना राबवली जात असून या उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या जनसर्वेक्षणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
या जनसर्वेक्षणातून राज्याच्या विकासासाठी सामान्य जनतेच्या सूचना, अपेक्षा आणि विचार संकलित करण्यात येणार आहेत. या माहितीच्या आधारे महाराष्ट्राचे भविष्यातील दिशा ठरवण्यात मदत होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “सर्वसामान्य माणसाचा सहभाग ही लोकशाहीची खरी ताकद आहे. राज्याचा विकास केवळ सरकारपुरता मर्यादित राहता कामा नये. जनतेचा थेट सहभाग असल्यानेच हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे.”
सर्वेक्षणात शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती, रोजगार, महिला व युवक विकास, नागरी सुविधा, पर्यावरण अशा विविध विषयांवर मत मांडता येणार आहे. नागरिकांनी या माध्यमातून आपली मते, सूचना आणि अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणातून मिळणारे निष्कर्ष ‘विकसित भारत – २०४७’ या केंद्र शासनाच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राच्या विकासाच्या योजनांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.