डोंबिवलीकरांना दिलासा – मोठागाव फाटकावर चारपदरी पुलाला मंजूरी
डोंबिवलीतील पश्चिम भागातील नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. मोठागाव-माणकोली उड्डाणपुलाशी जोडलेल्या दिवा-वसई रेल्वे मार्गावरील रेतीबंदर रोडवर असलेल्या मोठागाव रेल्वे फाटकावर चार पदरी उड्डाण पूल बांधण्यास रेल्वे प्रशासनाने अखेर मंजुरी दिली आहे.
यामुळे मोठागाव फाटकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे होणारी मोठी वाहतूक कोंडी आणि खोळंबा या त्रासातून डोंबिवलीकरांना कायमची सुटका होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनाने एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पुलाच्या बांधकामासोबतच भूसंपादन आणि रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या सुमारे सहाशे रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यांच्या पुनर्विकासासाठी एकशे अडतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर भूसंपादनासाठी तीस कोटी रुपये मजूर करण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मागील दोन वर्षांपासून या कामासाठी रेल्वे आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नागरिकांनी या प्रकल्पासाठी जोरदार पाठपुरावा करून चार पदरी उड्डाण पूल बांधण्याच्या आराखड्याला मंजुरी मिळवण्यात यश मिळवले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे या मंजूर निधीला प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी तातडीने मागणी केली आहे. हा पूल पूर्ण झाल्यावर डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल.